पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी मुंबईत आयोजित 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''भारत 2026 मध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. 40 वर्षांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सत्र आयोजित करणे ही अभिमानाची बाब आहे.''
तत्पूर्वी मुंबईत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे विमानतळावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. (Latest Marathi News)
टीम इंडियाच्या विजयावर मोदी काय म्हणाले?
141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) सत्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानविरुद्धच्या या ऐतिहासिक विजयासाठी मी टीम इंडिया आणि भारतीयांचे अभिनंदन करतो. भारताने क्रिकेट सामन्यात अतिशय नेत्रदीपक विजय मिळवला असल्याचे ते म्हणाले. खेळ हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. भारतातील खेड्यापाड्यात गेलात तर प्रत्येक सण खेळाशिवाय अपूर्ण असल्याचे लक्षात येईल.
ते म्हणाले की, ऑलिम्पिकचे आयोजन हे देशातील 140 कोटी भारतीयांचे जुने स्वप्न आहे. 2029 मध्ये होणाऱ्या युथ ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी भारत देखील खूप उत्सुक आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा पाठिंबा भारताला मिळत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.