HSRP Number Plate : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) नियम तोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. वाहनांवर लावलेली नियमबाह्य काळी फिल्म (काळ्या काचा), फॅन्सी किंवा आकर्षक नंबर प्लेट, HSRP नंबर प्लेट न लावणे आणि इतर राज्यातून येणाऱ्या लक्झरी बसेसवर आरटीओने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.
मागील १५ दिवसांत राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ३९५ वाहनांवर कारवाई करत ८ लाख ९ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. गाड्यांवर अशा प्रकारचे बेकायदेशीर बदल आढळल्यास पुढेही असाच दणका दिला जाईल, असा इशारा आरटीओ प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नाहक दंड टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या वाहनांवर नियमानुसार HSRP नंबर प्लेट लावावी आणि बेकायदेशीर बदल तातडीने काढून टाकावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयने १ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शहरात वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवली होती. यादरम्यान वाहनांवरील नियमबाह्य काळी फिल्म, आकर्षक अथवा फॅन्सी नंबर प्लेट, HSRP नंबर प्लेट नसलेली वाहने तसेच इतर राज्यात नोंदणीकृत लक्झरी ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण ३९५ चलन करण्यात आले असून, त्यापैकी १६७ चलनांचा भरणा करण्यात आला. त्यातून ८ लाख ९ हजार २७० रुपये दंड वसूल करण्यात आला.
कारवाईमध्ये नियमबाह्य काळी फिल्म प्रकरणी १६ चलनांपैकी ६ चलनांचा भरणा होऊन ३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर २७५ चलन करण्यात आले असून, १०६ चलनांचा भरणा होऊन १ लाख ८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. फॅन्सी नंबर/नियमबाह्य नोंदणी क्रमांक दर्शविण्याच्या प्रकरणी ५९ चलनांपैकी ३२ चलनांचा भरणा होऊन २० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच इतर राज्यातील नोंदणीकृत ट्रॅव्हल्स बसेसवर ४५ चलन करण्यात आले असून, २३ चलनांचा भरणा होऊन ६ लाख ७७ हजार ७७० रुपये दंड वसूल करण्यात आला.
वाहनमालकांनी आपल्या वाहनावर नियमबाह्य अथवा फॅन्सी नंबर प्लेट असल्यास ती तात्काळ काढून शासनाच्या नियमानुसार HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी. तसेच वाहनांच्या काचांना शासनाच्या नियमांचे उल्लंघन होईल अशा पद्धतीने काळी फिल्म लावू नये. वाहनांमध्ये अनधिकृत फेरबदल करून वाहनाची मूळ रचना अथवा सुरक्षा मानकांमध्ये बदल करू नये. वाहनांची नंबर प्लेट शासनाने निर्धारित केलेल्या मानकांनुसार असणे आवश्यक आहे. वाहनांवर नियमबाह्य नंबर प्लेट, काळी फिल्म अथवा अनधिकृत फेरबदल आढळल्यास संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे यांनी कळविले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.