मुंबईसह महाराष्ट्रात पुढील ३-४ तासांत पावसाचा आणखीच जोर वाढणार आहे. तसेच राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईसह उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले असून सखल भागात पाणी शिरलं आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.
अशातच पुढील तीन ते चार तासांत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली तेथील नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बचावपथकांच्या काही तुकडांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. समुद्र किनारपट्टीवर नागरिकांनी फिरण्यासाठी जाऊ नये, असा सल्लाही देण्यात आलाय.
आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरती येणार आहे. त्यामुळे उंच लाटा उसणार आहेत. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित असून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रत्नागिरी तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याने पर्यटकांनी फिरायला जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.