संघर्ष गांगुर्डे | साम टीव्ही न्यूज | डोंबिवली
प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करायची, अशा गंभीर गुन्ह्यातील एका सराईत आरोपीला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आदर्श म्हात्रे असे या आरोपीचे नाव असून सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून तो तरुणींशी संपर्क साधत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणामुळे सोशल मीडियावरील ओळखी, ऑनलाईन नातेसंबंध आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
मॅट्रिमोनिअल आणि सोशल मीडियावरून जाळे
पनवेल परिसरामध्ये राहणारा आदर्श म्हात्रे हा सुरुवातीला सोशल मीडियावरून तरुणींशी ओळख वाढवत असे. या मैत्रीचे रूपांतर नंतर तो प्रेमसंबंधात करायचा आणि संबंधित तरुणींचा विश्वास संपादन करायचा. तरुणींचा पूर्ण विश्वास बसल्यानंतर तो त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून विविध बँकांमधून त्यांच्याच नावावर मोठी कर्जे (Loans) काढायचा आणि त्या पैशांवर डल्ला मारून त्यांची फसवणूक करायचा.
बळी पडलेल्यांमध्ये उच्चशिक्षित महिलांचा समावेश
या संपूर्ण प्रकरणात आरोपीने आतापर्यंत तब्बल १४० हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या या महिलांमध्ये उच्चशिक्षित आणि नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. आर्थिक, कॉर्पोरेट तसेच व्यावसायिक क्षेत्रातील महिलांची संख्या यामध्ये लक्षणीय असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
११ तरुणी आल्या पुढे; नवी मुंबईतही गुन्हे दाखल
आदर्श म्हात्रेला यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी अशाच फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर आता डोंबिवलीतील एका पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी त्याचा ताबा घेत पुढील तपास सुरू केला आहे. आतापर्यंत एकूण ११ पीडित तरुणींनी पुढे येत तक्रारी दिल्या असून, आणखी काही महिला तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.