सागर आव्हाड, साम टीव्ही
दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज पुण्यात युवक काँग्रेसच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील तरुणाई ही दिल्लीमध्ये एकवटली असून सीजीपेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी झालेल्या लाठीचार्जवरून विरोधकांनी अभिजीत दीपके आणि इतर आंदोलकांची भेट घेत मोदी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडला आहे. तसेच त्याठिकाणी खासदार सुप्रिया सुळे देखील सामील झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील मुख्य कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुसळधार पावसातही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून होते. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. पावसाची तमा न बाळगता कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर वातावरण तापल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.