पुण्यात धक्कादायक प्रकार!
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे सांगत ब्लेडचे तुकडे खाऊ घातले
पतीला न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली
कारावासासोबत आरोपीला ७० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे सांगत कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घातल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. आरोपीला सात वर्षांच्या कारावासासह ७० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
ही घटना २०२३ मध्ये घडली होती. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने तिला औषधाच्या गोळ्या असल्याचे भासवून कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घातल्याचा आरोप होता. या प्रकारामुळे महिलेला गंभीर शारीरिक त्रास सहन करावा लागला. ऑक्टोबर २०२३ मध्ये संबंधित महिलेच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. याच काळात दोन वेळा शौचावाटे ब्लेडचे तुकडे बाहेर पडले. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी त्रास वाढल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान तिच्या पोटात ब्लेडचा आणखी एक तुकडा असल्याचे निष्पन्न झाले. तपासातून या घटनेमागे पती असल्याचे समोर आल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान पत्नीने न्यायालयात पतीविरोधातील आरोप नाकारले. त्यांच्यातील वाद मिटल्याचेही तिने सांगितले. मात्र, डॉक्टरांनी दिलेली साक्ष आणि वैद्यकीय तपासणीतून समोर आलेले निष्कर्ष आरोपीविरोधातील महत्त्वाचे पुरावे ठरले. ब्लेडचा तुकडा प्राणघातक ठरू शकला असता, असे डॉक्टरांनी न्यायालयात स्पष्ट केले.
सरकारी पक्षातर्फे ॲड. पाठक यांनी सात साक्षीदार तपासले. पत्नी फितूर झाली असली, तरी उपलब्ध वैद्यकीय पुरावे आणि अन्य साक्षीदारांचे जबाब दुर्लक्षित करता येणार नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला. पत्नी आरोपीसोबत राहत असून त्याच्यावर अवलंबून असल्याने तिने साक्ष बदलली असण्याची शक्यताही सरकारी पक्षाने मांडली. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. महिलेकडून आरोपीवर असलेले अवलंबित्व लक्षात घेऊन आजन्म कारावासाऐवजी ठराविक मुदतीची शिक्षा आणि दंड पुरेसा असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.