रुपाली बडवे, साम टीव्ही
Corona Virus In Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार सतर्क झालं आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने सरकारी आणि निम सरकारी कार्यालये, कॉलेज आणि बँकांमधील कर्मचाऱ्यांना मास्क बंधनकारक केलं आहे. (Latest Marathi News)
साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी याबाबतचा आदेश दिला आहे. दरम्यान, साताऱ्यात अचानक मास्कसक्ती करण्यात आल्याने राज्यातील नागरिकांचे टेन्शन वाढलं आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांचं (Corona Virus) प्रमाण वाढत असताना कोणताही मोठा धोका नसल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून मी दर २४ तासात याबाबत आढावा घेत असून आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना देत असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर सध्यातरी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात मास्क सक्ती करण्याची परिस्थिती नाही. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यासह औषधांचा पुरवठा मुबलक असल्याची माहिती देखील आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. मास्क वापरणे ऐच्छिक असून गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा, सोशल डिस्टेसिंगचे पालन करा, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाल्याने सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं आहे. एकीकडे हवामानातील बदलामुळे लहान मुलांपासून मोठ्या लोकांचा तब्येती खराब झाल्या आहेत. भर उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे अनेकांना घसा दुखणे, सर्दी खोकला आणि ताप आला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी राज्यात कोरोनाचे २४८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.