मुंबई लोकलचा बोजवारा! १० तासांपासून प्रवाशांचे हाल, मध्य रेल्वेची नेमकी स्थिती काय? वाचा

Central Railway Local Train Delay: मुंबईत २६ ऑक्टोबर रोजी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याच्या वेळा, लोकलची सद्यस्थिती आणि प्रवाशांना झालेल्या त्रासाबाबत सविस्तर वाचा.
CENTRAL RAILWAY DISRUPTION
CENTRAL RAILWAY DISRUPTIONsaam tv
Published On: 

मध्य रेल्वेची वाहतूक आज २६ ऑक्टोबर रोजी सकाळपासून विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम झाला. तब्बल नऊ तासांहून अधिक काळ लोकलची वाहतूक विस्कळीत राहिल्याने संध्याकाळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहे. लोकल गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना ताटकळत राहावं लागत आहे. दरम्यान, लोकलच्या भोंगळ कारभारामुळे २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जारी करत सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि दुरुस्तीच्या कामाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमका बिघाड कुठे झाला?

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजून ३० मिनिटांनी मुंबई विभागातील कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे कांजूरमार्ग स्थानकासह विक्रोळी आणि भांडुपदरम्यानच्या मार्गावरील सिग्नल यंत्रणा प्रभावित झाली. परिणामी मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. बिघाड झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गाड्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. कांजूरमार्ग स्थानकावर तसेच विक्रोळी-भांडुपदरम्यान विशेष कार्यपद्धतीचा अवलंब करून गाड्या चालवण्यात आल्या. संबंधित मार्गांवर सुरक्षा नियमांनुसार गाड्यांचे परिचालन करण्यात आले.

टप्प्याटप्प्याने सिग्नल यंत्रणा पूर्ववत

सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने काम सुरू केले. त्यानंतर बाधित मार्गांवरील सिग्नल यंत्रणा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आली. मध्य रेल्वेने दिलेल्या वेळेनुसार, डाउन जलद मार्ग दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी, अप जलद मार्ग ४ वाजून ४६ मिनिटांनी, डाउन धीमा मार्ग सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी, तर अप धीमा मार्ग सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी पूर्ववत झाला. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे दिवसभर लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. संध्याकाळी कार्यालये सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी स्थानकांवर पोहोचलेल्या प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला. लोकल उशिराने धावत असल्याने स्थानकांवर गर्दी वाढली आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं.

CENTRAL RAILWAY DISRUPTION
Mumbai Railway Accident: 15 ते 20 फूट फरफटत नेलं; एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

दरम्यान, लोकल वाहतुकीशी संबंधित घटनेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना रेल्वे रुळांवरून चालणे किंवा रूळ ओलांडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पूल, एस्केलेटर किंवा लिफ्टचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com