

मध्य रेल्वेच्या आसनगाव-कसारा मार्गावर विशेष रेल्वे ब्लॉक जाहीर.
१३/१४ आणि १४/१५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ब्लॉक घेण्याचे नियोजन.
रात्री ११.१० ते मध्यरात्री १.४० या वेळेत काम होणार.
संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम तसेच कसारा रेल्वे स्थानकातील अप यार्ड मार्गिकेच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री विशेष रेल्वे ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे लोकलसह मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
मध्यरेल्वेच्या नियोजनानुसार, १३/१४ नोव्हेंबर आणि १४/१५ नोव्हेंबर या दोन रात्री रात्री ११.१० ते मध्यरात्री १.४० या वेळेत खर्डी-कसारा दरम्यान अप मुख्य मार्गिका आणि तिसऱ्या मार्गिकेवर नॉन-इंटरलॉकिंग व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत खर्डी ते कसारा दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
ब्लॉकमुळे सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणारी रात्री ९.३२ नंतरची लोकल आसनगाव स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे. रात्री ११.०५ वाजताची कसारा लोकल खर्डी स्थानकापर्यंत धावेल. ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी शेवटची लोकल रात्री ८.४४ वाजता सुटणार आहे. कसारा येथून सीएसएमटीच्या दिशेने रात्री १० वाजता शेवटची लोकल सुटेल. ब्लॉकनंतर कसारा येथून पहिली लोकल पहाटे ३.५१ वाजता रवाना होईल.
या विशेष ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना कसारा स्थानकात २० ते २५ मिनिटे थांबविण्यात येणार आहे. सीएसएमटी-हावडा, एलटीटी-बनारस, सीएसएमटी-गोरखपूर विशेष, एलटीटी-पाटलीपुत्र, सीएसएमटी-अमृतसर, बनारस महानगरी आणि गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेससह अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी तसेच रेल्वे यार्डच्या विस्तारीकरणासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. मात्र, रात्रीच्या वेळेत कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांसह कसारा, खर्डी, उंबरमाळी, आटगाव आणि आसनगाव परिसरातील प्रवाशांना या बदलांचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे सुधारित वेळापत्रक तपासावे आणि प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.