

नवी मुंबई प्रभाग 17 निवडणुकीला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ
15 जानेवारीला मतदानावर प्रश्नचिन्ह
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात ७० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी टीका केली. यासंदर्भात विरोधी पक्षातील काही नेते न्यायालयात देखील गेलेत. यादरम्यान नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक १७ (अ) च्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलीय. त्यामुळे आता येथील प्रभागात १५ जानेवारीला मतदान होणार का नाही, हा प्रश्न उपस्थित होतोय.
प्रभाग क्रमांक १७ (अ) मधून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेले भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. निवडणूक आयोगाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यासंदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेतली, याप्रकरणी न्यायालयाने येथील निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिलीय. याप्रकरणी उद्या शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवार निलेश भोजने यांचा अर्ज फेटाळला होता. आयोगाच्या या आदेशावर अंतरिम स्थगिती देत मुंबई हायकोर्टाने निवडणुकीलाही अंतरिम स्थगिती दिली. भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याने महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम १० (1 ड) अंतर्गत त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने प्रथमदर्शनी बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने अधिकारांचा वापर केला असं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाचे निलेश भोजने यांना दिलासा दिलाय.
नवी मुंबईत भाजपच्या उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज बाद झाल्याने प्रभाग १७ अ मधील भाजपची उमेदवारी संकटात सापडली होती. पण पक्षाने वेळ वाया न जाऊ देता रणनीती बदलत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दर्शन भोईर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपने या प्रभागात आपला पॅनल उभा केला. त्यामुळे थेट शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवारांविरोधात थेट लढत असणार आहे. दर्शन भोईर यांनी भाजपातील पक्षप्रवेशानंतर भाजपच्या विचारधारेनुसार काम करून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.