

संजय गडदे
मुंबईकरांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आलीये. ८ एप्रिल २०२६ पासून मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएकडून मेट्रो लाईन ९ आणि मेट्रो लाईन २बी या दोन नव्या मार्गिका प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत
या नव्या बदलामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदरमधील काशिगाव दरम्यान थेट मेट्रोने प्रवास करणं आता शक्य होणार आहे. यामुळे रोजच्या प्रवासात वेळ वाचणार असून प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच मेट्रो सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब ठरणार आहे.
त्याचप्रमाणे चेंबूर आणि हार्बर लाईन परिसरालाही मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मेट्रो लाईन ७ आणि लाईन ९ या दोन्ही मार्गिका एकत्रितपणे चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुरळीत होईल आणि एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत जाण्याची गरज कमी होईल. दुसरीकडे, लाईन २ए आणि लाईन ७ या आता स्वतंत्रपणे चालवण्यात येणार आहेत.
अंधेरी ते काशिगाव थेट प्रवास
नवीन भागांना मेट्रो कनेक्टिव्हिटी
कमी प्रतीक्षा वेळ
जलद आणि आरामदायी प्रवास
सोपे आणि सुधारित वेळापत्रक
सुधारित वेळापत्रकानुसार गर्दीच्या वेळेत प्रत्येक ५ ते ६ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार आहे. तर इतर वेळेत ८ ते १० मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे. त्यामुळे लोकांना आता प्रवासासाठी वेळ कमी होणार असून प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
या बदलांमुळे प्रवाशांना अनेक फायदे मिळणार आहेत. अंधेरी ते काशिगाव दरम्यान थेट प्रवास करता येणार आहे. नवीन भागांना मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. प्रतीक्षा वेळ कमी होईल आणि प्रवास जलद व सोपा होईल. एकूणच, रोजच्या धावपळीत मेट्रो प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, या नव्या मार्गिकांमुळे मुंबई मेट्रो नेटवर्क अधिक मजबूत होणार आहे. भविष्यात सुमारे ३३७ किलोमीटरचे एकात्मिक मेट्रो जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.