अंबरनाथमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण
गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला
उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू
अजय दुधाणे, अंबरनाथ
अंबरनाथमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबरनाथच्या पालेगाव परिसरात प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने गंभीर वळण घेतले आहे. पुतणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून संबंधित तरुणीच्या चुलत्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान के ई एम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी रात्री पालेगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय संबंधित तरुणीच्या चुलत्याला होता. याच कारणावरून तरुणीच्या चुलत्याने आणि त्याच्या साथीदारांनी पीडित तरुणाचे फिटनेस जिमसमोरून अपहरण केले. त्यानंतर त्याला एका मोकळ्या मैदानात नेऊन लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूच्या साहाय्याने बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १ जुलै रोजी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. पीडित मुलाच्या मृत्यूनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी पालेगाव येथील भाजपा नगरसेविका पूनम पाटील यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मारहाण करणारे आरोपी नगरसेविकेशी संबंधित असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला. मात्र पूनम पाटील यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा ओमचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचे कलम लावण्यात आल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली. उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.