यवतमाळमध्ये कुलरमुळे १४ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू
खेळता खेळता मुलाला बसला शॉक
कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वीच मृत्यू
लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित
यवतमाळ - संजय राठोड
Yavtmal 14 Month Baby Death News यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील शिरोली गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कुलरमध्ये आलेल्या विद्युत प्रवाहाचा जोरदार शॉक लागून अवघ्या १४ महिन्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वराज सुरज उले असे या मृत मुलाचे नाव असून या घटनेने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळच्या सुमारास घडली. स्वराजची आई अंगणात सडा-सारवण करण्याच्या कामात व्यस्त होती, तर घरातील इतर सदस्य झोपेत होते. त्या दरम्यान स्वराज अंगणात एकटाच खेळत होता. घरातील कुलर सुरू असल्याने त्यात पाणी भरलेले होते. खेळता खेळता स्वराज कुलरजवळ गेला.
कुतूहलापोटी त्याने कुलरच्या पाण्याच्या टाकीत हात टाकला. मात्र, त्याच क्षणी कुलरमध्ये आलेल्या विद्युत प्रवाहाचा त्याला जोरदार शॉक बसला. घटना घडताच क्षणी कुटुंबीयांनी तातडीने कुलर बंद केला आणि स्वराजला त्वरित जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विद्युत उपकरणे वापरताना योग्य काळजी घेणे, वायरिंगची नियमित तपासणी करणे आणि उपकरणे सुरक्षित स्थितीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. स्वराजच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.