

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपची चर्चा सुरू आहे. दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांबाबत मोठा दावा केला होता. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून आपल्या नावाने 500 कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये. या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीये. त्याचप्रमाणे 500 कोटी रुपये कोणी दिले आणि ते पैसे कुठे गेले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी सांगितलं की, 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकारण्यांचे खरे चेहरे समोर आलेत. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दोन्ही बाजूंकडून हा विषय थांबला असल्याचं सांगितलं जातंय.
आंदोलन थांबवण्यासाठी 500 कोटी रुपये दिल्याचा दावा केला जात असेल आणि हे पैसे श्रीकांत शिंदे यांना दिल्याचे सांगितले जात असेल तर त्याची चौकशी का होऊ नये, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. हे पैसे नेमके कुठे गेले, याचा तपास झाला पाहिजे. हे प्रकरण हवाला व्यवहाराशी संबंधित असल्याचा दावाही त्यांनी केला.
दोन ते पाच लाख रुपयांच्या हवाला प्रकरणांत लोकांना तुरुंगात जावं लागतं. अनिल देशमुख यांना केवळ आरोपांच्या आधारे अटक करण्यात आली, असा मुद्दाही राऊत यांनी मांडला. मग 500 कोटी रुपयांच्या या प्रकरणात आतापर्यंत गुन्हा का दाखल झालेला नाही, असा सवाल त्यांनी केला. विशेष तपास पथकाच्या (SIT) नावाखाली सुरू असलेले खेळ आता थांबवले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. 500 कोटी रुपयांच्या प्रकरणावर ते आवाज का उठवत नाहीत? त्यांना या प्रकरणातील रक्कम ऐकू येत नाही का, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणावर आम्ही शांत बसणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 500 कोटी रुपये दिलेत का, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रकरणाला वाचा फोडली आहे, असं संजय राऊत म्हणालेत. भाजपच्या नेत्यांवर टीका करताना त्यांनी भाजपवाल्यांचा अकलेचा दुष्काळ तीव्र असल्याचंय म्हटलंय.
500 कोटी रुपयांची कथित ऑडिओ क्लिप संजय राऊत यांनी तयार केली, असं काही जण म्हणत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. यावर टीका करताना राऊत म्हणाले की, या लोकांना मूल झालं तरी त्याचं कारण संजय राऊत यांनाच ठरवतील. या लोकांची विचार करण्याची पातळी इतकी खालावली आहे, असे ते म्हणाले. या लोकांना स्वतःचा मेंदू नाही. त्यामुळे ते बिष्णोईंच्या मेंदूने चालतात, अशी टीकाही राऊत यांनी केली.
श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी मोठ्या रकमेच्या व्यवहारांचा उल्लेख केला. ते दोन हजार आणि पाच हजार कोटी रुपयांचे व्यवहार पाहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी 500 कोटी रुपये ही किरकोळ रक्कम आहे, असं राऊत म्हणालेत. श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीतही हजारो कोटी रुपये पोहोचवले, असा आरोपही त्यांनी केला.
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी संजय कौल यांचे भाऊ नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदे यांचे वकील असल्याचा उल्लेख केला. खुर्चीवर असताना असे विषय समोर आणले पाहिजेत, असे ते म्हणाले. चंद्रचूड यांनी आपल्या पुस्तकातून या विषयावर गौप्यस्फोट केल्याचा दावाही राऊत यांनी केला. आमचा खटला चंद्रचूड यांच्यासमोर चालला होता. त्या वेळी त्यांनी सरकारला पूरक निर्णय दिले, असा आरोप त्यांनी केला. या निर्णयांमुळे पक्षांतराला चालना मिळाली, असेही राऊत म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. आंदोलन करण्यासाठी आम्हाला परवानगी घ्यावी लागते, मात्र काही लोकांना परवानगीची गरज पडत नाही, असं ते म्हणाले. ग्रामीण भागात वडिलांना 'बाप' असं म्हटलं जातं. मोदी आणि ज्ञानेश कुमार जाणार, असं म्हटल्यावर त्यांचा बापही जाणार, असं वक्तव्य करण्यात आलं. या सरकारचा बापही जाईल, असंही म्हटलं गेलंय असा उल्लेख राऊत यांनी केला.
दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना संजय राऊत यांनी 1 तारखेच्या गर्दीचा उल्लेख केला. 1 तारखेला झालेली गर्दी डोळ्यांसमोर ठेवा, असं ते म्हणालेत. या आंदोलनाला व्यापारी विरोध करत असल्याचं सांगितलं जातं. मात्र हे व्यापारी नेमके कोण आहेत, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.