शिवसेनेच्या मेळाव्यात असं काय घडलं? 'या' वक्त्याच्या भाषणाने ठाकरेंच्या डोळ्यांत आणलं पाणी

Nitin Chandanshive speech : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिन सोहळ्यात सांगलीच्या युवा कवी नितीन चंदनशिवे यांनी केलेल्या भावनिक आणि आक्रमक भाषणाने उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे भावूक झाले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam tv
Published On

"शिवसेनेचा जन्म कधीच सत्तेसाठी झाला नव्हता, तो इथल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाला होता" असे म्हणत सांगलीच्या युवा कवीने शिवसेनेचा वर्धापन दिन गाजवला. नितीन चंदनशिवे या सांगलीतील कवठे महांकाळ येथील तरुणाने आपल्या आक्रमक आणि तितक्याच भावनिक भाषणाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नितीन चंदनशिवेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या मुलाखतीचा किस्सा सांगितला. त्याशिवाय कोरोनामधील उद्धव ठाकरेंच्या कामाचे खास कौतुक केले. नितीन चंदनशिवे यांचं भाषण सुरू असताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे भावुक झाले. चंदनशिवेंनी आपल्या भाषणात फुटीर खासदारांचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात नितीन चंदनशिवे यांनी आपल्या आक्रमक आणि भावनिक भाषणाने संपूर्ण सभागृहाला विचार करायला भाग पाडले. उद्धव ठाकरे भेटत नाहीत किंवा वेळ देत नाहीत, अशी तक्रार करून पक्षाची साथ सोडणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. नितीन चंदनशिवेंच्या भाषणाने उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि उपस्थित असणारे सर्व नेते भावूक झाल्याचे दिसले. नितीन चंदनशिवेंनी फुटीर ६ खासदारांसह शिंदे आणि फडणवीस यांच्यावर तोफ डागली.

न भेटताही रक्ताची नाती तयार झाली!

भाषण करताना चंदनशिवे यांनी कोरोना काळातील एक भावूक आठवण सांगितली. ते म्हणाले, "लोक म्हणतात साहेब भेटत नाहीत, जवळ येत नाहीत. पण कोरोनाच्या काळात जेव्हा माझी आजी टीव्ही बघायची, तेव्हा ती अजिबात घाबरत नव्हती; कारण टीव्हीत दिसणारे उद्धव साहेब तिला स्वतःच्या लेकासारखे वाटायचे. संकटाच्या काळात ते माझ्या आईला सख्या भावापेक्षा जवळचे आणि आम्हाला मामासारखे वाटले. न भेटताही लोकांसोबत अशी रक्ताची नाती तयार झाली." हे ऐकताना मंचावर उपस्थित असलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

बाळासाहेब ठाकरेंच्या निखिल वागळे यांनी घेतलेल्या शेवटच्या मुलाखतीची आठवण कवी चंदनशिवेंनी यावेळी काढली. पत्नीच्या (मां च्या) आठवणीने भावूक होणारे, डोळ्यात पाणी आणून खिशातला फोटो दाखवणारे कणखर बाळासाहेब ठाकरेंचे रूप भावत असल्याचे ते म्हणाले. शिवसैनिकांनी या ६० वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. दोन भावांचे दुःख आणि अंतर्गत संघर्ष जवळून अनुभवला आहे. अनेक आघात झाले, तरीही शिवसेना फाटली नाही किंवा तुटली नाही, ती जिद्दीने उभी राहिली आणि पुढेही उभी राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंवर काय म्हणाले ?

चंदनशिवे म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मातीत, ग्रामीण भागात आणि गावगाड्यावर जे विचार पेरले होते, ते आजही तळागाळात जिवंत आहेत आणि उगवलेले आहेत. बाळासाहेबांनी पेरलेल्या या विचारांच्या रोपट्याला आता त्यांच्या नातवाने म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी पाणी घालण्याची गरज आहे. आदित्य ठाकरेंनी नव्या पिढीला सोबत घेऊन जर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, तर एक नवा आणि बलशाली महाराष्ट्र उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"देवेंद्रचे 'देवाभाऊ' होण्यासाठी १५०० रुपये वाटावे लागले"

नितीन चंदनशिवे यांनी यावेळी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून निशाणा साधला. "तुम्हाला 'देवेंद्र'चे 'देवाभाऊ' होण्यासाठी १५०० रुपये वाटावे लागले. निवडणुकीत मतांसाठी बहिणीच्या ताटात दिलेली ओवाळणी, निवडून आल्यानंतर परत काढून घ्यायलाही हा भाऊ विसरला नाही," अशी थेट टीका त्यांनी लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत केली.

Uddhav Thackeray
शिवसैनिक खचला नाही, उलट पेटलाय; भाजपच आता शिंदेसेनेत विलीन होईल की काय अशी भीती, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

'तोडा आणि फोडा'च्या राजकारणावर तोफ

"देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर (विरोधी पक्षात) असताना जास्त आवडतात," असा उपरोधिक टोला लगावत चंदनशिवे पुढे म्हणाले की, सत्ताधारी पक्षात आल्यावर ते फक्त 'तोडा आणि फोडा'चे राजकारण करतात. आता राजकारणाची व्याख्या बदलली पाहिजे आणि माणसे जोडून मराठी मन घडवले पाहिजे. आधी गुवाहाटी आणि आता जयपूर, हे जे काही सुरू आहे, तो मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराचा, लोकशाहीचा आणि संविधानाचा घोर अपमान आहे. आम्ही २० मार्कांचे नागरिकशास्त्र शिकलोय, त्यामुळे सध्या राजकारणात नक्की काय चाललंय हे आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना समजेनासे झाले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाही, अस्मितेसाठी!

पक्षाच्या निष्ठेवर बोलताना ते म्हणाले, "मी इथे महाराष्ट्रातील मराठी मातीचा आणि प्रत्येक मराठी मनाचा, गावगाड्यातील म्हाताऱ्यांपासून ते नुकत्याच जन्माला आलेल्या मुलांच्या हृदयातील ठोक्यांचा हुंदका घेऊन आलो आहे. शिवसैनिक हा महाराष्ट्राची शान आणि स्वाभिमान आहे. शिवसेनेचा जन्म कधीच सत्तेसाठी झाला नव्हता, तर तो येथील मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि हक्कांसाठी झाला होता. त्यामुळे कोण सोडून गेलं किंवा कोण नवीन आलं, याने शिवसेना कधीच संपली नाही आणि ती कधी संपणारही नाही."

Uddhav Thackeray
'आमची पोरं कशाला पळवता? स्वतःच्या वांझोट्यापणावर उपचार करा'; शिवसेना पुन्हा फुटल्यावर ठाकरेंनी घेतला तिखट शब्दात समाचार

निष्ठावंतांनाच 'निष्ठा' कळते!

शेवटी सत्ताधाऱ्यांना सुनावताना ते म्हणाले, "तुम्ही मराठी माणसासाठी प्रामाणिकपणे लढलात, म्हणून महाराष्ट्राने आणि माय मराठीने ही सत्ता तुमच्या पदरात दिली होती. पण सध्या या गोष्टीचा विसर पडल्यामुळे बरीच गणिते बदलली आहेत. रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचे जे साक्षीदार आहेत, त्यांनाच खरी 'निष्ठा' काय असते हे समजते. अशाच निष्ठावंतांना चवदार तळ्याच्या पाण्याचे महत्त्व आणि भिडेवाड्यातील पहिल्या शाळेत सावित्रीबाई फुलेंनी गिरवलेल्या अक्षरांचा खरा अर्थ उमजतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com