

योगेश काशिद, बीड | साम टीव्ही
saurabh sonawane clarifies allegations in vilas ghule Killing case : विलास घुले हत्या प्रकरणानं पुन्हा बीड चर्चेत आलं. या हत्या प्रकरणी पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याचंही नाव आहे. आरोप होत असल्यानं स्वतः सौरभ हा माध्यमांसमोर आला आहे. विलास घुलेची हत्या झाली त्यादिवशी कुठे होतो? काय काय केलं, असा संपूर्ण दिनक्रम सांगितला. तसेच विलास घुले हत्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, असं सौरभने स्पष्ट केलं.
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील टाकळी येथे विलास घुले या हॉटेल चालकाची हत्या झाली होती. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. त्याच्या हॉटेलसमोरच दोन गटांत झालेला वाद सोडवण्यासाठी घुले गेला होता. त्यावेळी एका टोळक्यातील तरुणांनी त्याची हत्या केली. या घटनेमुळं ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. आरोपींना अटक करण्याची मागणी करताना त्यांनी रास्ता रोकोही केला.
या हत्या प्रकरणावरून राजकारणही तापलं होतं. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याचं नाव या प्रकरणात घेण्यात आलं होतं. पुरवणी जबाबातही सौरभ सोनवणे याचं नाव आहे. त्याबाबत बजरंग सोनवणे यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकरणाशी माझ्या मुलाचा काही संबंध असेल तर खरंच त्याच्यावर सरकारनं कठोर कारवाई करावी, असं ते म्हणाले होते.
घुले हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर, तसेच आरोप झाल्यानंतर सौरभ सोनवणे याने व्हिडिओच्या माध्यमातून आरोप फेटाळले आहेत. घुले यांची हत्या झाली त्या दिवशी कुठे होतो, काय काय केलं, याची माहिती त्यानं दिली. विलास घुलेची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. घटनेच्या दिवशी मी येडेश्वरी कारखान्यावर होतो. दुपारी आलो तिथून मी घरीच होतो. दुसऱ्या दिवशीही सकाळी मी घरीच होतो. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. माझी गाडीही घराजवळच होती, असे त्यातून स्पष्ट झाले आहे, असे सौरभने सांगितले.
या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच सत्य समोर आले पाहिजे. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. मात्र, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले आहेत. वस्तुस्थिती त्यातून स्पष्ट होईल. या घटनेमागील सत्य पोलीस प्रशासन जनतेसमोर नक्की आणेल, असंही सौरभ याने सांगितले.
केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत होणार आहे. आयपीएस वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्यात आली आहे. खून प्रकरणाचा तपास एसआयटीकडे वर्ग झाला असून, तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्व नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव घेण्यात आले असून, त्याचा देखील तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.