
पुणे : राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, जालना, सोलापूर, नाशिक, वाशिम सारख्या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाल्याचं दिसलं. हवामान विभागने आज पावसाचा इशारा दिला होता. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे.
पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार पाऊस बरसला. पुण्यातील पेठांमध्ये तसेच कोथरूड परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पुण्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. शिरुर तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाच्या सरी सुरु झाल्या आहेत.
मागच्या दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत होती. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत असला तरी वादळी वाऱ्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात आज सायंकाळी विजेच्या कडकडासासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील वेगवेगळ्या भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारवा दिला आहे. तरी नागरिकांची काही प्रमाणावर तारांबळ देखील उडाली.
वाशीम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज वाशिमसह रिसोड,मालेगाव शहर आणि मसला, पेन, केशवनगर आणि परिसरातील ग्रामीण भागात रिमझिम पाऊस सुरू झाला. हवामान विभागाने वाशिम जिल्ह्यात दोन दिवसाचा यलो अलर्ट जारी केला. या अवकाळी पावसामुळे हळद, बीजवाई, कांदा आणि ज्वारी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जालन्यातील भोकरदन तालुक्यात अवकाळी गारांच्या पावसाचा शेतीपिकांना फटका बसला आहे. काढणीला आलेली मका पीक पावसामुळे आडवं झालं. भोकरदन तालुक्यातील धोंडखेडा, कोदा या परिसरात अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला. अवकाळी पावसामुळे भोकरदन तालुक्यातील धोंडखेडा गावातील जनार्धन मुठ्ठे या शेतकऱ्याचं एक एकर मकाच्या पिकाचं नुकसान झालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.