पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर: अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'सावजी' समाजाबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत हलबा समाज युवा संघटनेच्या युवा संघटनेच्या वतीने नागपुरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. गोळीबार चौक येथे आंदोलन करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांच्या व्यक्तव्याचा निषेध नोंदवला. या प्रकरणी मुंढे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तहसील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. संबंधित वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप करत आंदोलकांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, तुकाराम मुंढे यांनी कधी नागपूरच्या गोळीबार चौकातील सावजी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला आहे का? आमच्या आई-बहिणी प्रत्येक घरातून सावजी व्यवसायाशी जोडलेल्या आहेत. या व्यक्तव्याचा निषेध करत आंदोलकांनी मुंढे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. हलबा समाज युवा संघटनेचे पदाधिकारी स्वप्नील खापेकर यांनी सांगितले की, तुकाराम मुंढे यांनी तात्काळ माफी मागावी. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. गरज पडल्यास त्यांच्या मुंबईतील कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात येईल.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका कार्यक्रमात मी सावजी खाल्ला तर एक महिना आजारी पडेन, असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वक्तव्यामुळे हलबा समाजातील हलबा आणि कोष्टी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सावजी ही विदर्भाची खाद्यसंस्कृती आणि समाजाची ओळख सांगून अनेकांनी आपली भूमिका मांडली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.