Weather Update in Marathi : पावसाने माघार घेतल्यानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर भारतामध्ये किमान आणि कमाल तापमानात घट होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी सुरु झालेली आहे. दिल्लीसह हरियाणा अन् मध्य प्रदेशमध्ये हुडहुडी भरण्यास सुरु झाले आहे. राज्यात नोव्हेंबरमध्ये थंडीचे प्रमाण कमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सध्या राज्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरी आहे. काही ठिकाणी थंडीची चाहूल लागल्याचे चित्र आहे. रात्री जोरदार थंडी पडत आहे, तर दिवसा कडाक्याचे ऊन जाणवत आहे.
महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामान आहे, त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरु आहे. विदर्भ आणि कोकणात उन्हाची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पहाटे गारठा दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाने आज (ता. ५) तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी अंशतः ढगाळ हवामान कायम असल्याचे दिसून आले.
उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी १६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रासह मध्य भारतात थंडीची चाहूल लागल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात मागील काही दिवसांमध्ये सकाळी हवेतील गारवा वाढला आहे. पहाटे गारठा वाढत असला तरी राज्यात गुलाबी थंडीसाठी वाट पाहावी लागणार आहे.
सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान सरासरी इतके म्हणजे ३३ डिग्रीच्या आसपास आहे तर पहाटेचे किमान तापमान मात्र भाग बदलत सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्री अधिक म्हणजे २२ डिग्रीच्या आसपास आहे. आज, मंगळवार दि. ५ नोव्हेंबर पासून निरभ्र आकाशासहित संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीला सुरवात होवू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.