परभणी जिल्ह्यात सर्वत्र आभाळ फाटल्यागत पाऊस झालाय. परिणामी शेतकऱ्यांची सर्वच पिके सोयाबीन कापसासारखी पिके पूर्णपणे पाण्यात गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेय. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हिस्सी येथील एका शेतमजूर शेतकऱ्याचेही या अतिवृष्टीच्या पावसामुळे सात एकरवरील कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. हा धक्का बसल्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.
Complaints of farmers to insurance company: पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. परभणी 52 पैकी 50 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांचे 90 टक्क्यांपर्यंत क्षेत्र बाधित झाले आहे. विमा कंपनीने ऑनलाइन आणि ऑफलाईन तक्रार अर्जही स्वीकारावेत, असे आशयाचे पत्र परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी विमा कंपनीला काढले. शेतकऱ्यांनी अल्पवधीतच साडे पाच लाख तक्रारी विमाकंपनीकडे दाखल केल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. तर जिल्ह्यात बागायती शेतीच मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेती लागवड केली पण सततच्या पावसामुळे बागायती शेतीत पाणी साचून पिक खराब होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिर्ची, वांगी, कारले, सेंगा यांचे पिक गळून पडले असून झाडांच्या वेली पिवळ्या पडल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करित आहेत.
सलग पावसाचा उडीद, मूग, कोथंबीर टोमॅटोला फटका मोठा फटका बसलाय. तुरही पिवळी पडून पिक धोक्यात आली आहेत.
अति मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. त्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली. गोरगरीब शेतकरी खचला आहे, त्यांना आधार देणं सरकारचं काम आहे, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता, त्यांना मी सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केलीय, असे जरांगेंनी यावेळी सांगितले.
सणासुदीच्या दिवसात सातत्याने सर्व धान्यांमध्ये दरवाढ होत असली तरी मात्र सोयाबीनला वर्षभरात हमीभाव देखील मिळाला नाही. वर्षभर 4 हजार रुपये प्रतिक्विंटल वर सोयाबीनचे दर स्थिरावले होते. मात्र आता महिन्याभरात सोयाबीनच्या हंगाम सुरू होत असताना सोयाबीनला 4 हजार 600 रुपयांवर दर मिळाला आहे. सोबतच पाच ते साडेपाच हजार रुपयावर स्थिरावलेल्या हरभऱ्यालाही पहिल्यांदाच 7हजार500 रुपयापर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..
गेल्या काही दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. अनेक शेतक-यांनी लागवड केलेल्या मेथी पिकाला त्याचा फटका बसलाय. पावसामुळे मेथी पिवळी पडली असल्याने शेतात काही प्रमाणात भाजीपाला खराब होत आहे. मेथीशिवाय इतर भाजीपाल्याला फटका बसलाय. त्यामुळे किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या महिन्याच्या अखेरीस दर वाढण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केलीय.
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 92.10 टक्क्यांवर पोहचलाय. सध्या 11 हजार क्यूसेक इतकी आवक सुरू आहे. दोन दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्याशिवाय नाशिक जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे गोदावरी नदीतून येणारी आवकही कमी झाली आहे. जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून 500 क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग केला जातोय. त्यामुळे आता हळूहळू जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. जवळपास 95% च्या वर त्यानंतर पाणी सोडणे बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
नाशिकच्या नांदगाव तालूक्यातील मध्यम प्रकल्प असलेले माणिकपुंज धरण शंभर टक्के भरून सांडव्यावरुन पाणी मन्याड नदी वाहू लागले आहे. ३९५ दशलक्ष घनफुट क्षमता असलेले माणिकपुंज धरण भरल्याने नांदगावच्या पुर्व भागातील शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण असून या धरणावर पूर्व भागातील १० ते १२ गावांसह चाळीसगाव तालूक्यातील ८ गावांमधील सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात गेल्या महिनाभरात पुण्याच्या भोरमधल्या नीरा खोऱ्यातील भाटघर धरणातून १३, तर निरा देवघर धरणातून ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग निरा नदीत सोडण्यात आला. २०१७ नंतर 7 वर्षांनी यंदा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जलसंपदा विभागाने दिली.
नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे व खानदेशसाठी वरदान ठरलेले गिरणा धरण ९६.८ टक्के भरले आहे. दोन दरवाजे ३० सेंटी मीटरने उघडण्यात आले आहे. गिरणा धरणातील पाण्याचा मालेगाव व जळगाव जिल्ह्याला पिण्याचा व सिंचनासाठी फायदा होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.