

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली
प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला
सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत महत्वाची माहिती सांगितली
अजित पवार असते तर विलिनीकरण झाले असते, असे तटकरे म्हणाले.
राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना आता उधाण आले आहे. अशातच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मोठं विधान केले आहे. त्यांनी विलिनीकरणाबाबत पहिलं स्पष्टीकरण दिलं. 'अजितदादा असते तर विलिनीकरण झालं असतं. विलिनीकरणासाठी १२ फेब्रुवारीची तारीख ठरली होती.', अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठं विधान केले. त्यांनी सांगितले की, 'दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची सध्या तरी कुठलीच चर्चा नाही. पण अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसले असते. अजित पवार यांच्या निधनामुळे ही चर्चा मागे पडली. अजित पवार असते तर जी १२ फेब्रुवारी ही तारीख जी सांगितली जाते ती निश्चित झाली असती.'
सुनील तटकरे यांनी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतरच पुन्हा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू झाली. 'या भेटीमध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. प्रफुल्ल पटेल तब्येतीची विचारपूस करायला गेले होते. त्यावेळी काही राजकीय चर्चा झाली असेल पण ती नेमकी कुठल्या संदर्भात असं काही भाग नाही. या भेटीचा कुणी राजकीय अन्वयार्थ काढू नये.' असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले.
दरम्यान, शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापूरच्या दुष्काळी दौऱ्यावर असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शरद पवार यांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांनी रुग्णालयात गर्दी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.