तुमचा एकही दिवल स्ट्रीट फूड खाल्ल्याशिवाय जात नाही...मात्र हे स्ट्रीट फूड तुमच्या जीवाशी खेळतंय. साम टीव्हीच्या ऑपरेशन स्ट्रीट फूडमध्ये या धोकादायक आणि विषारी खेळाचा पर्दाफाश झालाय. अन्न व औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कसा आणि कुठे सुरू आहे हा गोरखधंदा ? पाहूयात यावरचा हा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट.........
हॉटेल आणि रस्त्यावरील ठेल्यांवर मिळणारे अन्न आपण आवडीने, चवीने खातो, पण ते अन्न नसून तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारं विष आहे. याच स्ट्रीट फूडच्या नावानं विकल्या जाणाऱ्या विषाचा साम टीव्हीच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झालाय. आम्ही छत्रपती संभाजीनगरात हॉटेल्स आणि फूड स्टॉल चालकांकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसल्याची खळबळजनक माहिती 'सामच्या ऑपरेशन स्ट्रीट फूडमध्ये समोर आलीय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 26 हजार अन्न विक्रेते असताना गेल्या अनेक वर्षात विक्रेत्यांची कुठलीच तपासणी झाली नाही... त्यामुळे साम टीव्हीच्या टीमनं शहरातल्या काही नामांकित हॉटेल्सपासून ते गल्लीबोळातील फूड स्टॉल्सवर जाऊन 'रियालिटी चेक' केलं तेव्हा धक्कादायक आणि किळसवाणं चित्र पाहायला मिळालं. हे चित्र पाहून तुमचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत.
दरम्यान विनापरवाना आणि निकृष्ट अन्न विकणाऱ्या विक्रेत्यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 5 लाखांच्या दंडाची कडक तरतूद असूनही इथे मात्र कायद्याला यांनी थेट केराची टोपलीच दाखवल्याचं उघड झालंय...त्यामुळे सर्वसर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
सर्वसामान्यांची आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू असताना अन्न व औषध प्रशासन मात्र झोपा काढत असल्याचं खळबळजनक वास्तव आमच्या ऑपरेशनमधून समोर आलंय.
छत्रपती संभाजीनगर शहरात एकूण 26 हजार अन्न पुरवठादार आहेत. यामध्ये 12 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले 23 हजार 500 छोटे हॉटेल्स आणि फूड स्टॉल आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या 23,500 पैकी वर्षभरात केवळ 374 जणांचीच तपासणी करण्यात आलीय... म्हणजेच गेल्या वर्षात दोन टक्के हॉटेल्सचीही तपासणी झालेली नाही. यातही 36 चालकांना 1 लाख 91 हजारांचा दंड झाला, तर नमुने दोषी आढळलेल्या 12 चालकांकडून 1 लाख 57 हजार वसूल केले गेले. मोठ्या हॉटेल्सचे 97 प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवले, त्यातील फक्त 7 प्रकरणांचा निपटारा झाला.
सर्वात संतापजनक म्हणजे, अन्नाची तपासणी करण्यासाठी आलेली हक्काची शासकीय वाहनं आज कार्यालयाच्या आवारात धूळखात पडून आहेत.
अन्न सुरक्षा विभाग हा सर्वसामान्यांच्या आरोग्याचा बळी देणाऱ्या या हॉटेल माफियांवर कुणाची मेहेरबानी आहे? कुणाच्या आशीर्वादानं दिवसाढवळ्या हा जीवघेणा खेळ सुरू आहे? असे अनेक गंभीर प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.