

राज्य सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील चार पदरी उन्नत मार्गाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाक्यापर्यंतच्या चार पदरी उन्नत मार्गिकेस आवश्यक निकडीचा सार्वजनिक प्रकल्प ( Vital Public Project) म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या प्रकल्पासाठी विविध शासकीय विभागाच्या जमिनी कोणताही भोगवटा मूल्य न आकारता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित होणार असल्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण होण्याचा मार्ग खुला झालाय. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निर्देश होते. त्यानुसार या प्रकल्पाच्या निकडीची आणि अनुषंगिक बाबींची पडताळणी करून, हा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सोलापूर शहर, जिल्ह्यांतील वाहतुकीसह, आंतरराज्यीय वाहतूक सुरळीत होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील सोलापूर शहरातून जाणारा जुना पुणे नाका ते बोरामणी नाका उन्नत मार्ग सोलापूर शहरातील आणि आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान चार पदरी उन्नत मार्ग आणि आवश्यक तिथे सेवा रस्ता आणि पोच मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या उन्नत मार्गामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी बहुतांश जमीन राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ताब्यात आहे. सार्वजनिक हिताच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी शासकीय जमीन संबंधित विभागाला वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प आवश्यक निकडीचा सार्वजनिक म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर विविध शासकीय विभागांच्या ताब्यातील जमीन कोणताही भोगवटा मूल्य न आकारता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यासही मान्यता देण्यात आली.
प्रकल्पाची लांबी - ९.६६० किलोमीटर चार पदरी उन्नत मार्ग
रँम्प – सहा, छोटे पुल – तीन
किंमत – १०२०.५० कोटी रुपये.
प्रकल्पामुळे होणारे फायदे - सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीत घट होणार. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आधिक सुरक्षित आणि जलद होणार. इंधनाची बचत होणार, पर्यावरण प्रदूषणात कपात होणार.
औद्योगिक, व्यापारी आणि कृषि विकासाला चालना मिळणार. तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, सोलापूर या धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्थळांकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार. तसेच सोलापूर शहराच्या नियोजित विकासास, वस्त्रोद्योग आणि वैशिष्ट्यपूर्ण कापड उद्योगास गती मिळणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.