जळगावमध्ये महिला कर्मचाऱ्यावर छळाचा गंभीर आरोप
सुट्ट्यांच्या बदल्यात अश्लील मागणी केल्याचा आरोप
पोलिसांकडून गुन्हा दाखल; आरोपी फरार
महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चिंता व्यक्त
नाशिकमधील बहुराष्ट्रीत कंपनी असलेल्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराची घटना ताजी असतानाच, जळगावमधील एका नामंकित कंपनीतून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका नामंकित कंपनीच्या बॉसने महिला कर्मचारीकडे सुट्ट्यांच्या बदल्यात अश्लील मागणी केली. तसेच तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असून तिला धमकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित महिला कर्मचारीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी बॉस फरार असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, हा छळ गेल्या सात महिन्यांपासून सुरू होता. आपल्या आजारी मुलीची काळजी घेण्यासाठी तिने संबंधित बॉसकडे रजेची मागणी केली होती. मात्र, सहानुभूती दाखवण्याऐवजी आरोपीने अत्यंत आक्षेपार्ह मागणी केली. “तू मला खूश केलं, तर मी तुला जास्त दिवसांची सुट्टी देईन,” असे म्हटल्याचा आरोप आहे. या मागणीला महिलेने ठाम नकार दिल्यानंतर आरोपी संतापला आणि त्याने तिच्यावर शारीरिक हल्ला करत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
इतकेच नव्हे, तर आरोपीने राजकीय नेत्यांशी आणि गुंडांशी संबंध असल्याचे सांगून महिलेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, घटनेचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला गप्प राहण्यास भाग पाडले. आरोपीने तिला इतर महिलांनाही त्याच्याकडे पाठवण्याचा दबाव टाकल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मानसिक आणि शारीरिक छळ सहन केल्यानंतर अखेर पीडितेने आपल्या कुटुंबीयांसह धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.