

अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला
अजितदादा गेल्यावर तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, असा आरोप कदम यांनी केला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आता राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत चर्चा देखील सुरू आहेत. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'अजित पवार गेल्यानंतर सुनिल तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावली.', असं खळबळजनक विधान रामदास कदम यांनी केले.
जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान कोकणात राजकारण तापले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभादरम्यान राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यातच रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवरून आता राजकारणांत खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे यांच्यावर आरोप करत रामदास कदम म्हणाले की, 'अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधी वहिनींना शपथ घ्यायला सुनील तटकरे यांनी भाग पाडलं. १० दिवस गेले असते तर काय झालं असतं? शरद पवार ताबा घेतील या भीतीने वहिनींना शपथ घ्यायला त्यांनी भाग पाडलं.'
तसंच 'सुनील तटकरे यांनी केलेली ही कृती निंदनीय आहे. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. सुनील तटकरे विश्वासघातकी आहेत. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना संपवण्याचे काम तटकरे यांनी केलं. लोकसभेत त्यांना मी निवडून आणले मात्र योगेश कदम यांना पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.', असा देखील गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.