सातारा जिल्ह्यामध्ये बिबट्याचा वावर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. याठिकाणी वानराच्या पिल्लाचा शिकार करायला गेलेल्या बिबट्याला विजेचा धक्का लागला. विजेच्या डीपीला स्पर्श झाल्यामुळे वानर आणि बिबट्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. साताऱ्यातील आसनगावजवळच्या राकुसलेवाडी येथे ही घटना घडली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील मौजे आसनगाव येथील राकुसलेवाडी गावामध्ये मृत अवस्थेत बिबट्या आणि वानराचे पिल्लू आढळून आले. लाइटच्या डीपी शेजारी दोघेही मृतावस्थेत आढळून आले आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावांमध्ये पसरली. त्यामुळे गावकऱ्यांनी या शेतामध्ये मोठी गर्दी केली.
बिबट्या वानराच्या पिल्लाची शिकार करायला गेला. त्यावेळी वानराने लाइटच्या पोलवर उडी मारली. यावेळी डीपीला स्पर्श झाल्यामुळे त्याला शॉक लागला. यावेळी बिबट्याने त्याच्यावर झडप मारली. अशामध्ये शॉक लागून दोघांचीही जागीच मृत्यू झाला. राकुसलेवाडी गावातील जानाई देवी मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावरती ही घटना घडली आहे. गावकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. दोघांचेही मृतदेह त्यांनी ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगावमध्ये देखील दोन आठवड्यापूर्वी अशीच घटना घडली होती. बिबट्या मोराची शिकार करायला गेला असता त्याचा मृत्यू झाला होता. शिकार करत असताना मोराने ट्रान्सफॉर्मरवर उडी मारली त्यावेली त्याला विजेचा धक्का लागला. बिबट्या मोराची शिकार करत असताना त्याला देखील विजेचा धक्का लागला. दोघांचा देखील जागीच मृत्यू झाला. ही घटना २० जुलै रोजी घडली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.