सातारा:
लोकसभेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का देत साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा फडकावला. लोकसभेनंतर आता विधानसभेतही भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी शिवेंद्रराजे भोसले सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे ढासळलेला बालेकिल्ला सावरण्याचे मोठे आव्हान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह, महाविकास आघाडीसमोर असेल. गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीकडून दीपक पवार यांनी शिवेंद्रराजे भोसलेंना आव्हान दिले होते. मात्र या निवडणूकीत शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासमोर महायुतीमधूनच विरोध होण्याची शक्यता आहे. कसं असेल सातारा विधानसभेचं राजकारण; वाचा सविस्तर...
सातारा शहर, ग्रामीण आणि संपूर्ण जावळी तालुका मिळून सातारा विधानसभा मतदार संघ तयार होतो. सातारा विधानसभा मतदार संघ हा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. १९७८ पासून याठिकाणी अभयसिंहराजे भोसले हे सातारा विधानसभेचे नेतृत्व करत होते. त्यानंतर २००४ पासून शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा याठिकाणी आमदार म्हणून निवडून आले.
२०१९ मध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, ज्यामुळे राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेले. २०१४ मध्ये राष्ट्रवादीत असलेले शिवेंद्रराजे भोसले हे भाजपमध्ये जाऊन आमदारकीच्या रिंगणात उतरले. २०१४ मध्ये भाजपमध्ये असलेल्या दीपक पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत शिवेंद्रराजेंविरोधात शड्डू ठोकला.
सुरुवातीला एकतर्फी होईल, असे वाटलेल्या शिवेंद्रराजेंना दीपक पवार यांनी कडवी झुंज दिली, मात्र त्यांना विजय साकारता आला नाही. या निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांना 1 लाख 18 हजार 5 मतं मिळाली होती. तर दीपक पवार यांना 74 हजार 581 मतं मिळाली होती. मात्र आता या पंचवार्षिकमध्ये शिवसेना तसेच राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेले आहे. ज्यामुळे राजकीय समीकरण कसे असेल, याबाबत आताच सांगणे कठीण आहे.
सातारा विधानसभेत महायुतीकडून विद्यमान आमदार म्हणून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले हे मुख्य दावेदार आहेत. मात्र शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटही या जागेवर दावा ठोकण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतही शिंदे गटाने सातारा लोकसभेवर दावा केला होता. त्यामुळे विधानसभेलाही हेच चित्र राहिल्यास बंडखोरी थोपवण्याचे मोठे आवाहन महायुतीसमोर असेल.
तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही दीपक पवार हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून पवार यांना पुन्हा मैदानात उतरवले जाणार की शिवेंद्रराजेंना रोखण्यासाठी शरद पवार नवा डाव टाकणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता, लोकसभेत उदयनराजेंचा विजय, जिल्हा बँक, अजिंक्यतारा कारखान्यातील सत्ता या शिवेंद्रराजेंच्या जमेच्या बाजू आहेत.
दुसरीकडे दीपक पवार यांच्याकडे शरद पवार यांचा करिश्मा, राष्ट्रवादीची फळी सोडता जिल्हा बँक, संस्था, किंवा राजकीय सत्ता नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना तसा कठीण असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत पुन्हा दीपक पवार विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये सामना होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.