
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाईंड असणाऱ्या वाल्मीक कराड अखेर पोलिसांच्या शरण आला आहे. पुण्यातील सीआयडीच्या समोर वाल्मीक कराडने सरेंडर केलं. कालपासून वाल्मीक कराड सीआयडीसमोर शरण होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
अखेर आज १२ वाजता वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. सीआयडी कार्यालयाबाहेर वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. वाल्मीक कराड पोलिसांच्या शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांच्या मुलीने सांगितले की, 'आरोपीला अटक करण्यासाठी ऐवढा वेळ लागत असेल तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची. आम्हाला न्याय कधी मिळणार आहे. माझी एकच मागणी आहे की सीडीआरनुसार जे आरोपी आहेत ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते ३ आरोपी फरार आहेत त्यांना लवकरात लवकर अटक केली पाहिजे आणि सीडीआरनुसार आणखी जे आरोपी असतील त्यांना देखील अटक करा. तुमची पुढील कारवाई सुरू करून माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या ऐवढीच अपेक्षा करते.'
वाल्मीक कराड खंडणी प्रकरणात पोलिसांच्या शरण आले आहेत. पण देशमुख हत्याप्रकरणात माझा काहीच संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संतोष देशमुखांच्या मुलीने सांगितले की, 'आम्हाला ऐवढंच वाटते की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आज ते शरण गेले आहेत. पण वाल्मीक कराड हे देखील म्हणाले की मी आरोपी असेल तर माझ्यावर कारवाई करा. त्यामुळे आमचे हेच म्हणणे आहे की या हत्या प्रकरणात जे कोणी दोषी असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. इतर ३ आरोपींना लवकर अटक करा. पोलिसांना आमची विनंती आहे की आरोपींना लवकर अटक करा. २२ दिवस झाले आहेत त्यामुळे आम्हाला न्याय कधी मिळणार आहे.'
तर, संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका देशमुख चौधरी यांनी देखील न्यायाची अपेक्षा केली आहे. 'सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 22 दिवस उलटून आज 23 वा दिवस उजाडला असला तरी हत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे आम्ही न्यायाची अपेक्षा कशी ठेवायची असा सवाल प्रियंका देशमुख चौधरी यांनी उपस्थित केला आहे.
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचा दावा वाल्मीक कराडने पोलिसांसमोर केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मीक कराड फरार झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधासाठी सीआयडीची पथके तयार करण्यात आले होते. वाल्मीक कराडचे शेवटचे लोकेशन पुणे होते. १७ डिसेंबरला वाल्मिक कराडचे शेवटचं ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात होतं. पुण्यातून फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती समोर आली होती. अखेर आज तो सीआयडीसमोर हजर झाला. सध्या सीआयडीचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.