माधव सावरगावे, साम टीव्ही
आषाढी वारीसाठी श्री संत एकनाथ महाराजांच्या मानाच्या पालखीचे आज सूर्यास्तासमयी पंढरपूरकडे प्रस्थान होत असतानाच, पालखीच्या अधिकाराचा जुना वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून, नाथांच्या नावाने पारंपरिक मार्गावरून दुसरी पालखी किंवा दिंडी काढण्यास प्रतिबंध घालावा, अशी मागणी संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात श्री संत एकनाथ महाराज संस्थान पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथबुवा नारायणबुवा पालखीवाले गोसावी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दुसरीकडे, नाथ वंशजांनी आपली पायी दिंडी ही अनेक दशकांपासूनची परंपरा असून ती यंदाही नियोजनानुसारच निघणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख आणि मानाच्या पालख्यांमध्ये पैठणच्या श्री संत एकनाथ महाराज संस्थानच्या पालखीची गणना होते. अनेक दशकांपासून ही पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात आहे. मात्र, या पालखीच्या अधिकारावरून गेल्या काही वर्षांत मोठा वाद निर्माण झाला होता, जो थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निर्णयात श्री संत एकनाथ महाराज यांच्या नावाने निश्चित केलेल्या पारंपरिक मार्गावरून पालखी काढण्याचा अधिकार केवळ रघुनाथबुवा नारायणबुवा पालखीवाले गोसावी यांनाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या या स्पष्ट आदेशानंतरही त्याच नावाने दुसरी पालखी किंवा दिंडी काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो बेकायदेशीर आहे."
रघुनाथबुवा पालखीवाले गोसावी (प्रमुख, संस्थान पालखी सोहळा)
संस्थानने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असली, तरी नाथ वंशजांनी याला विरोध केला आहे. आपली पायी दिंडी ही आजची नसून अनेक दशकांपासून सुरू असलेली परंपरा आहे. त्यामुळे ही परंपरा खंडित न करता, यंदाही ठरलेल्या नियोजनानुसारच दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल, अशी ठाम भूमिका नाथ वंशजांनी घेतली आहे.
पालखी प्रस्थानाच्या ऐन मुहूर्तावर हा वाद पुन्हा उफाळून आल्याने पैठण आणि वारकरी संप्रदायात चिंतेचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत जुन्या पालखी सोहळा प्रमुखांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.