Sangli District Central Cooperative Bank election result winner list : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. सर्वपक्षीय बिनविरोध निवडणुकीच्या गणितातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना चार हात लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जत सोसायटी गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरून गोपीचंद पडळकर यांनी दणदणीत विजय मिळवत जिल्हा बँकेत एन्ट्री केली आहे. या विजयानंतर पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पडळकरांचा धनगरी वेशभूषेत डान्स; 'बाप तो बाप रहेगा'चा गजर
विजयी झाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. खांद्यावर घोंगडे, हातात काठी, डोळ्यांवर गॉगल आणि पारंपरिक धनगरी वेशभूषेत पडळकर थेट बँकेच्या दारात पोहोचले. 'बाप तो बाप रहेगा' आणि 'मै हूँ डॉन' या गाण्यांवर पडळकर समर्थकांसह बँकेच्या दारात जोरदार थिरकले.
"टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला!" - गोपीचंद पडळकर
विजयानंतर बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर थेट निशाणा साधला. "मला बाजूला ठेवून बिनविरोधची खेळी खेळली जात होती. मात्र, जतच्या जनतेने विरोधकांना टप्प्यात आणून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे," अशी खोचक टीका त्यांनी केली.
"वाळव्याच्या गब्बरसिंगाने आता सावध राहावं" - सदाभाऊ खोत
आमदार सदाभाऊ खोत यांनीही या विजयावर बोलताना जयंत पाटलांवर जोरदार टोला लगावला. "प्रस्थापितांच्या चिरेबंद वाड्याला पडळकरांच्या विजयाने मोठा तडा दिला आहे. वाळव्याच्या नेत्याने जिल्हा बँकेला 'अलीबाबाची गुहा' बनवले होते. पण आता या गुहेतील टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आमचा वाघ आत शिरला आहे. वाळव्याच्या गब्बरसिंगाने आता सावध राहावे," असा घणाघात खोतांनी केला.
माजी मंत्री अजितराव घोरपड्यांचा जयंत पाटलांवर षड्यंत्राचा आरोप
कवठेमहांकाळ सोसायटी गटातून विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते अजितराव घोरपडे यांनीही जयंत पाटलांवर निशाणा साधला. "माझ्याविरोधात मोठा कट रचला गेला होता, वरून ऑर्डर आली होती. मात्र, कट पूर्ण झाला नाही. या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड झाले असून याचे पडसाद आगामी काळात इतर पक्षांवर नक्कीच दिसतील," असा इशारा त्यांनी दिला.
सोसायटी गटातील ४ प्रमुख लढतींचे निकाल:
जत सोसायटी गट : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसच्या विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव केला. (पडळकर - ५४ मते, विनोद पवार - ३४ मते)
तासगाव सोसायटी गट: माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) माजी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या १ मताने पराभव केला. (संजयकाका - ३९ मते, सुमनताई पाटील - ३८ मते)
कवठेमहांकाळ सोसायटी गट: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी शरद पवार गटाच्या टी. व्ही. पाटील यांचा ४ मतांनी पराभव केला. (घोरपडे - ३७ मते, टी. व्ही. पाटील - ३३ मते)
मिरज सोसायटी गट: काँग्रेसच्या अण्णासाहेब कोरे यांनी भाजपच्या अनिल शेगूनशे यांचा २६ मतांनी पराभव केला. (कोरे - ४७ मते, शेगूनशे - १९ मते)
सांगली जिल्हा बँक - २१ जागांचे पक्षीय बलाबल:
काँग्रेस: ६ जागा
भाजप: ५ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): ४ जागा
शिवसेना (शिंदे गट): ३ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ३ जागा
सांगली जिल्हा बँकेतील २१ नवनिर्वाचित संचालकांची यादी:
१. गोपीचंद पडळकर (BJP)
२. राहुल महाडिक (BJP)
३. रवी देशमुख कडेपूर (BJP)
४. रणसिंह देशमुख (BJP)
५. पृथ्वीराज पाटील (BJP)
६. विश्वजित कदम (Cong)
७. महेंद्र लाड (Cong)
८. सौ. सावंत ताई (Cong)
९. अल्ताफ कोरे (Cong)
१०. पूजा विशाल (Cong)
११. K. D. कांबळे (Cong)
१२. विराज नाईक (NCP-SP)
१३. चेतराज पाटील (NCP-SP)
१४. वैभव शिंदे (NCP-SP)
१५. कुचेर आबा (NCP-SP)
१६. रणधिर नाईक (NCP-AP)
१७. अजितराव घोरपडे (NCP-AP)
१८. सुहास बाबर (शिवसेना - शिंदे गट)
१९. बाळासो होनराव (शिवसेना - शिंदे गट)
२०. तानाजी पाटील (शिवसेना - शिंदे गट)
२१. संजय पाटील तांबवे (अपक्ष)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.