समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत समृद्धी महामार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वाहतूक बंदच्या वेळा लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले आहे. भरवीर (नाशिक) इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर हे काम केले जाणार आहे.
या परिसरातील डोंगराळ भागात बोगद्यांच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच उतारावर दरड किंवा दगड कोसळण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी लोखंडी संरक्षणात्मक जाळ्या बसवण्यात येणार आहेत. पावसाळ्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हे काम करण्यात येत आहे.
महामार्ग पोलिसांच्या समन्वयाने 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान दररोज तीन सत्रांत मुंबईकडे जाणारी वाहतूक प्रत्येकी एका तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
- सकाळी: 10 ते 11 वाजेपर्यंत
- दुपारी: 1 ते 2 वाजेपर्यंत
- सायंकाळी: 4 ते 5 वाजेपर्यंत
या तीन वेळांमध्ये मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवण्यात येईल. मात्र, निर्धारित वेळांव्यतिरिक्त इतर वेळी वाहतूक पूर्ववत सुरू राहणार आहे. तसेच मुंबईहून नागपूरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील.
समृद्धी महामार्गावरील संरक्षणात्मक जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 7 नोव्हेंबरपासून वाहतूक नियमित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी प्रवासापूर्वी या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.