

अजय सोनवणे, नाशिक प्रतिनिधी
Nashik Yeola wedding diesel attack incident : प्रेमविवाहाचा राग मनात धरून नाशिकच्या येवला शहरात एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रेमात पडून लग्न केल्याच्या रागातून मुलीकडच्या लोकांनी थेट लग्न मंडपातच नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे लग्नसमारंभात एकच भगदड उडाली असून, दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे.
काय आहे नेमकी घटना?
येवल्यातील ऋषभ दीपक भगुंडे या तरुणाचे निफाड तालुक्यातील रामपूर नैताळे येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी सप्टेंबर महिन्यात घरच्यांच्या विरोधात जाऊन पळून जात कायदेशीररीत्या नोंदणीकृत (कोर्ट मॅरेज) विवाह केला होता.
आज येवल्यातील एका लॉन्समध्ये या दोघांचा पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात नवरदेवाकडील नातेवाईक उपस्थित होते. लग्न विधी सुरू असतानाच मुलीकडचे काही नातेवाईक तिथे पोहोचले. प्रेमविवाहाचा राग मनात असल्यामुळे त्यांनी सोबत आणलेल्या कॅनमधून डिझेल काढून नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांच्या अंगावर ओतले आणि त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
तुंबळ हाणामारी आणि पोलिसांची कारवाई
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच आरडाओरडा सुरू झाला. मात्र, नवरदेवाच्या नातेवाईकांनी प्रसंगावधान राखून प्रतिकार केला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर दोन्ही गटात लॉन्समध्येच तुंबळ हाणामारी झाली. हा सर्व थरार उपस्थितांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, दोन्ही बाजूंनी गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे येवला परिसरात मोठी सनसनाटी पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.