

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नात रेवती सुळेचं लग्न ठरलं. खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली. रेवती सुळेचं लग्न सारंग अरुण लखानी याच्यासोबत होणार आहे. रेवती आणि सारंग यांचा एकत्र असलेला फोटो शेअर करत स्मृती शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजयने देखील स्टेट्स ठेवत दोघांना शुभेच्छा दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांच्या होणाऱ्या जावयाचे नाव सारंग अरुण लखानी असे आहे. सारंग लखानी हे उत्तम बॅडमिंटनपटू आणि विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. अरुण लखानी हे नागपूरचे आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती नागपूरची सून होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने त्यांचे लग्न ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर रेवती आणि सारंग यांचा एकत्र असलेला फोटो शेअर करत 'अभिनंदन रेवती सुळे आणि सारंग लखानी तसंच त्यांचे कुटुंबीय' तसंच, रेवती सुळे यांचा भाऊ विजय सुळेने देखील सोशल मीडियावर दोघांचा फोटो पोस्ट करत 'काँग्रॅट्स सिस्टर अँड ब्रदर इन लॉ' असे लिहित शुभेच्छा दिल्या. त्यामुळे रेवती सुळेचे लग्न ठरल्याचे कन्फर्म झाले आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना दोन मुलं आहेत. रेवती सुळे आणि विजय सुळे अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती २७ वर्षांची असून तिचा जन्म ३० ऑक्टोबर १९९८ रोजी बारामतीत झाला. मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमधून तिने शिक्षण घेतलं. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमधून पदवीनचे शिक्षण पूर्ण केले. रेवती या राजकारणात सक्रीय नाहीत पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तिने आईसाठी प्रचार केला होता.
तर सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग लखानी हे विश्वराज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक आहेत. विश्वराज ग्रुप ऑफ कंपनी हा नागपूरमधील कंपनी असून जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. जलसिंचन, सांडपाण्यावर प्रक्रिया, पाणी व्यवस्थापन सारख्या प्रकल्पाची कामं ही कंपनी करते. सारंग यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.