
राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांना राज ठाकरेंनी दुजोरा दिला.
निवडणूक आयोग गोंधळ दाबून ठेवत असल्याची ठाकरेंची टीका.
२०१४ पासून सत्ता मतचोरीवर उभी असल्याचं ठाकरेंचं विधान.
राज ठाकरेंचा मतदारयादीतील घोळ उघड करण्याचा कार्यकर्त्यांना कानमंत्र.
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्होटचोरीचा मुद्दा उपस्थित केला. आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. 'आपल्याला मतं मिळतात, पण ती मतं मतपेटीतूनच चोरली जातात', असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. 'राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांची चौकशी झाली तर, गेल्या १० - १२ वर्षांचा सत्तेचा संपूर्ण खेळ उघडा पडेल', असंही ठाकरे म्हणालेत.
एका बाजूला राहुल गांधी तर, दुसऱ्या बाजूला भाजपचे अनुराग ठाकूर यांनीही मतांमध्ये गोंधळ असल्याचा आरोप केला. मात्र, हे प्रकरण निवडणूक आयोग दाबून ठेवत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना राज ठाकरेंनी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय. 'निवडणूक जिंकायची असेल तर, मतदारयादीतील घोळ उघड करा', असा कानमंत्र त्यांनी दिला.
राज ठाकरेंचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात राज ठाकरे म्हणाले, 'मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे, हे मी नेहमी सांगतो. शरद पवार, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांना यासाठी भेटलो होतो. पण शेवटच्या क्षणी सगळ्यांनी मागे हटण्याचं पाऊल उचललं. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची वेळ होती, तर जगभरात याची चर्चा झाली असती. आता राहुल गांधींनी तेच प्रकरण बाहेर काढलंय', असं राज ठाकरे म्हणाले.
'मतं मिळत नाहीत असं समजू नका, तुमची मतं चोरली जातात. या मतांची चोरी करतच काही पक्ष सत्तेत आलेत. 2014 पासून जो सत्तेचा खेळ सुरु आहे, तो या गोंधळामुळेच आहे', असंही राज ठाकरे म्हणाले.
भाजपने 132, शिंदे गटाने 56 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 42 जागा जिंकल्या. एवढं बहुमत मिळालं तरी महाराष्ट्रभर सन्नाटा होता. विजय साजरा करणं तर दूरच, पराभूत आणि विजयी दोघांनाही निकालावर विश्वासच बसला नव्हता, असं राज ठाकरे म्हणाले.
अलीकडेच झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींना शपथपत्र लिहून द्यायला सांगण्यात आलं. भाजपचे नेते अनुराग ठाकुर यांनीही सहा मतदारसंघांचा दाखला देत तसाच आरोप केला. त्यामुळे एकीकडे सत्ताधारी आणि दुसरीकडे विरोधक दोन्ही बाजूकडून एकच आरोप होत असताना आयोग मात्र गप्प आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.