छठ पूजा आली आणि वाद झाला नाही असं मुंबईत आजतायगत झालेलं नाही. यावर्षी छठ पूजेवरून राज्यातलं वातावरण प्रचंड तापलंय. याला कारण ठरलं ते उत्तर भारतीयांना खुष करण्यासाठी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर भोजपुरी गाणी वाजवणं... यावर मनसे आणि ठाकरेसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता खुद्द राज ठाकरेंनी यावरून भाजपवर तिखट शब्दांत हल्लाबोल केलाय. उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीसाठीच भाजपनं छठ पूजेवरून वाद निर्माण करण्याचा घाट घातल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. याबाबत त्यांनी मराठी माणसालाही सुनावलंय. ते काय म्हटले आहेत ते पाहूयात...
भाजप आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया सध्या मुंबई, महाराष्ट्रातील छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र भाजपला अपेक्षित तो संपर्ष उभा राहत नसल्यानं त्यांना खंत आहे, हा सगळा आटापिटा आगामी उत्तर प्रदेशातील निवडणुकांसाठी आहे. मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिलाच नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच 2 दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा. बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कुणी घातलाच, (अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही) तर शांत आहोत म्हणजे XXX नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावं. भाजपाला सांगणं आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणं यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा! मराठी बांधवांना-भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा! योग्य वेळी निर्णय घेऊ! असा सज्जड इशारा राज ठाकरेंनी दिलाय.
छठपूजेच्या नावाखाली मराठी माणसाला डिवचण्याचा हा डाव सुरू असतानाच, यात भर घातली ती अभिनेता सोनू सूदच्या एका व्हायरल व्हिडिओने. मुंबईतल्या छठ पूजेसाठी जुहू चौपाटीवर जमण्याचं जाहीर आवाहन त्यानं परप्रांतीयांना केलंय. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत.
गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी छटच्या नावाखाली एक नवा वाद जाणीवपूर्वक जन्माला घातला जातोय. उत्तर भारतात जिथे समुद्र नाही तिथं ही पुजा नदीच्या बाजूला तलावा जवळ कऱण्यात येते. मात्र मुंबईत गिरगाव चौपाटीवर ही पुजा करण्यासाठी परवानगी मागण्यात येते. मुंबई उच्च न्यायालयानं मात्र गिरगाव चौपाटीवरील आयोजनाच्या परवानगीची याचिका फेटाळून लावलीये. काही वर्षांपूर्वी मराठी माणसाला माहीतही नसलेल्या ही छठपूजेवरुन मराठी अस्मितेला आताच का वेठीस धरलं जातंय. 30 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात असलेला सोनू सुद आताच का छटपुजेसाठी व्हिडीओ करतो? आणि रेल्वेला अचानक भोजपुरी गाणी का वाजवावी लागतात याच उत्तर जर उत्तरप्रदेशची निवडणूक असेल तर मराठी माणूस, मराठी परंपरा आणि मराठी भाषेची अशीच वेळोवेळी गळचेपी होत राहणार...त्यामुळे या उन्मादाला वेसण घालण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.