

गिरीश महाजनांच्या प्रजासत्ताक दिनाच्या भाषणावरून वादाला तोंड फुटलंय
बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख न झाल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्याने संताप व्यक्त केला
गिरीश महाजनांच्या भाषणावरून प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आक्रमक भूमिका
मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटलं आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव वगळून केलेल्या भाषणावर वनरक्षक कर्मचारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले. या प्रकरणानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
नाशिकमधील प्रकारानंतर वनरक्षक माधवी जाधव यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फोनवरून संवाद साधला. आंबेडकरांनी माधवी जाधव यांना धीर दिला. त्यांनी या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करण्याचे आश्वासन जाधव यांना दिले. यावेळी माधवी जाधव यांनी घडलेला संपूर्ण घटनाक्रम आंबेडकरांकडे मांडला.
गिरीश महाजन यांच्या वागणुकीतून त्यांची 'मानसिकता' दिसून येत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. कृत्य केवळ अपमानजनक नसून अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा ठरणारे आहे, असेही ते म्हणाले. या प्रकरणानंतर वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. तर स्वतः प्रकाश आंबेडकर या प्रकरणाचा कायदेशीर ड्राफ्ट तयार करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडतील, असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले. 'आरएसएस आणि भाजपकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बहुजन समाजातील व्यक्तींचा अवमान केला जातोय" असं म्हणत त्यांनी गिरीश महाजनांचा जाहीर निषेध केला.
काय आहे प्रकरण?
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदानातील कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख राहून गेला. या भाषणावरून वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने माधवी जाधव यांना पाठिंबा दिलाय. या प्रकारानंतर प्रकाश आंबेडकरांनी ताबडतोब घटनेची दखल घेत कर्मचारी माधवी जाधव यांच्याशी संवाद साधला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.