>> भारत नागणे
पंढरपूर : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय. तर हे सरकार लवकरच कोसळेल असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे बारा आमदार व नेते फुटण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एका बड्या आमदाराचा समावेश आहे, असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज केला आहे.
आमदार शहाजी पाटील हे पंढरपुरात बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानाचाही चांगलाच समाचार घेतला. (Latest Marathi News)
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांनी नागपूर अधिवेशनानंतर राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडणार आहे, असे जे भाकीत केले आहे. त्यांचं वक्तव्य अत्यंत विनोदी असे आहे. त्याला कोणताही पुरावा नाही.
राज्यातील 170 आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सरकारच्या विरोधात बोलणं हे एवढ्यासाठी आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा आमदार व नेते फुटीच्या मार्गावर आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एका बड्या आमदाराचा समावेश आहे. काल देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या एका बैठकीला राष्ट्रवादीचे ते आमदार हजर होते, असा दावाही आमदार पाटील यांनी केला आहे.
सोलापुरातील ते आमदार कोण?
देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकदशीनिमित्त पंढरपुरात होते. त्यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात शासकीय विश्रामगृहावर विविध शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी समवेत बैठक घेतली होती. या बैठकीला माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे देखील उपस्थित होते. आमदार शिंदे यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु होत्या. त्यामुळे शहाजी बापू दावा करत असलेले आमदार बबन शिंदे तर नाहीत ना अशी चर्चा सुरु झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.