Akola : अकोल्यात मोठी राजकीय घडामोड, नेत्याने शपथपत्रात चौथं अपत्य लपवलं, उमेदवारी रद्द होण्याची शक्यता
फिरोजाबी राणा यांच्या शपथपत्रात चौथं अपत्य लपवल्याचा आरोप
कायद्यानुसार त्या उमेदवारीस अपात्र ठरू शकतात
तक्रारदारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली
निर्णय आता आयोगाच्या पुढील कृतीवर अवलंबून
अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत एक धक्कादायक माहिती समोर आलीये. एमआयएमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार फिरोजाबी शरीफ राणा यांनी उमेदवारीसोबत दाखल केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
१८ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेलं चौथं अपत्य लपवल्यात आलेल्या कागदपत्रांमधून स्पष्ट होत आहे. यामुळे फिरोजाबी यांच्या उमेदवारीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाये. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या नियमानुसार कोणत्याही उमेदवाराला १८ सप्टेंबर २००१ नंतर तिसरं अपत्य झालं असेल तर तो निवडणुक लपविण्यासाठी अपात्र ठरतो.
फिरोजाबी यांच्या शपथपत्रात घोळ
अकोट नगराध्यक्षपदासाठी फिरोजाबी शरीफ राणा या एमआयएमच्या महत्त्वाच्या उमेदवार आहे. मात्र, त्यांच्या शपथपत्रात मोठी गफलत — किंवा जाणूनबुजून केलेला लपवा-छपवीचा प्रयत्न समोर आलाये. शपथपत्रात एका ठिकाणी दोन अपत्य असल्याचा उल्लेख आहे. तर दुसऱ्या ठिकाणी तीन अपत्य असल्याची नोंद आहे. मात्र वास्तविक, फिरोजाबी यांना चौथं अपत्य आहे, आणि ते पूर्णपणे शपथपत्रातून लपविण्यात आलं आहे.
चौथ्या अपत्याचा जन्म 2002 मध्ये म्हणजे कायद्यानुसार उमेदवारी अपात्र!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या नियमांनुसार १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरं अपत्य झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही. दरम्यान, मिळालेल्या जन्म प्रमाणपत्रानुसार फिरोजाबी यांच्या चौथ्या मुलीचा निखत अंजुम यांचा जन्म २८ फेब्रुवारी २००२ रोजी झाला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की त्यांनी उमेदवारी अर्जात ही माहिती लपवल्यामुळे त्या कायद्याच्या कक्षेत थेट अपात्र ठरतात.
तक्रारदरांनी काय आरोप केला?
अकोटचे तक्रारदार मौलाना हाफीज उमर यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, “फिरोजाबी यांनी हेतुपुरस्सर चौथं अपत्य लपवलं आहे. निवडणुकीच्या नियमांनुसार त्या पात्रच नाहीत. आयोगाने याची तत्काळ दखल घ्यावी.” या प्रकरणावर निवडणूक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, कोणत्याही उमेदवाराने फिरोजाबी यांच्या अर्जावर आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे अर्ज रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
आरोपांवर फिरोजाबींची भूमिका काय?
शपथपत्रातील विसंगती आणि लपविलेल्या अपत्याबाबत प्रतिक्रिया विचारताच, फिरोजाबी राणा यांनी इन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी एवढंच सांगितलं की “हे सर्व विरोधकांचे राजकीय षडयंत्र आहे.”. आपल्याला मिळत असलेल्या जनसमर्थनामूळे विरोधकांनी हा मुद्दा समोर आणल्याचे ते म्हणालेत.
फिरोजाबी यांचे पती शरीफ राणांनी 2016 मध्ये नगराध्यक्षपदासाठी दिली होती काट्याची लढत
यावेळी एमआयएमच्या उमेदवार असलेल्या फिरोजाबी यांचे पती सय्यद शरीफ राणा हे अकोटमधील वंचित बहुजन आघाडीचे नेते होते. ते 2016 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्यांनी या निवडणूकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेत भाजपला जोरदार लढत दिली होती. मात्र, 2016 च्या निवडणुकीत भाजप उमेदवार हरिनारायण माकोडे यांनी त्यांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव केला होता.
शपथपत्रातील माहितीची पडताळणी निवडणूक आयोग करत नाही का?
या प्रकरणातून आणखी एक गंभीर प्रश्न समोर येतो. उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रातील माहितीची सत्यता तपासण्यासाठी निवडणूक आयोगाकडे कोणतीच स्वतंत्र यंत्रणा नाही. अगदी महत्त्वाच्या माहितीही उमेदवारावरच विसंबून राहते. त्यामुळे जाणूनबुजून चुकीचे तपशील देऊन निवडणूक लढविणे देखील शक्य होतं.
दरम्यान, अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत चर्चेत आलेले हे प्रकरण आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. फिरोजाबी राणा यांच्या शपथपत्रातील विसंगती आणि लपविलेल्या चौथ्या अपत्याच्या मुद्द्यावर आयोग कशी दखल घेणार, उमेदवारी यावरून रद्द होणार का, की ‘आक्षेप नाही’ या कारणावर प्रकरण थंडपणे झाकलं जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
