परभणीत दिवसाढवळ्या विद्यार्थ्याचे अपहरण
२५ हजारांची खंडणी मागणी
मारहाण करून पुलावरून खाली फेकले
दोन्ही पाय फ्रॅक्चर, मणक्याला दुखापत
पोलिसांकडून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Parbhani Kidnapping Case News परभणीमध्ये मानवत शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचे अज्ञात इसमांनी अपहरण केलं. इतक्यावरचं न थांबता अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी मारहाण करून त्याला रेल्वे उड्डाणपुलावरून खाली फेकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात गुंडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय सय्यद सुफियान सय्यद शाकेर हा विद्यार्थी मानवत येथील फार्मसी महाविद्यालयात डी.फार्मसी प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. आज सकाळी १० वाजता तो नेहमीप्रमाणे कॉलेजला जात होता. या दरम्यान महाराणा प्रताप चौक परिसरात एक अल्टो कार त्याच्या जवळ येऊन थांबली. त्या कारमधील मास्कधारी इसमांनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून त्याचे अपहरण केले. यानंतर विद्यार्थ्याकडे २५ हजारांच्या खंडणीची मागणी करण्यात आली, तसेच त्याला धमकावण्यात आले.
घाबरलेल्या सय्यदने त्याच्याकडे पैसे नसल्याचे त्यांना सांगितले. मात्र अपहरण कर्त्यांनी त्याची झडती घेऊन त्यांच्याकडचे हजार रुपये काढून घेतले. ही बाबा सय्यद कोणाला सांगू नये म्हणून आरोपींनी त्याला मानवतरोड येथील रेल्वे उड्डाणपुलावरून खाली फेकले. भरपूर उंचावरून फेकल्यामुळे सय्यदचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
विद्यार्थ्याने घडलेली घटना त्याचे वडील सय्यद शाकेर यांना कळवलं. त्यानंतर त्याला तातडीने मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाचा जवाब घेतला असून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. मात्र दिवसाढवळ्या गजबजलेल्या रस्त्यावर अपहरण झाल्याने जिल्ह्यातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.