भरत नागणे, साम टीव्ही
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात चांगलाच वाद रंगला आहे. एकनाथ शिंदे गटाशी संबंधित 'मला काहीतरी सांगायचंय' हे नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. या नाटकामार्फेत शिवसेना फुटीची कथा दाखवण्यात येणार आहे. याला उत्तर म्हणून शिवसेना ठाकरे गटाने "५० खोके एकदम ओके" हे नाटक रंगमंचावर आणण्याची तयारी सुरु केली आहे. यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.
शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) आज शुक्रवारी पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "५० खोके एकदम ओके" या नाटकावर टीका करताना शहाजीबापू म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी आदित्यच्या डोक्यावर हात ठेवावा सांगावे की पन्नास खोके दिले. मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो. असे थेट आव्हान शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी ठाकरे यांना दिले आहे.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची माहिती राज्याचे व्हिजन याबाबत काही सांगण्याची गरज नाही. राज्यातील सर्व जनतेला त्यांच्या कामाबद्दल माहिती आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे निवडणुकीच्या तोंडावर फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत. जनमत बनवण्यासाठी ते काही नाटके करत असतील", असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी ठाकरेंना लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस नेत्यांकडून आम्ही मोठा भाऊ असा वारंवार उल्लेख केला जात आहे. इतकंच नाही, तर पुढचा मुख्यमंत्री आमचाच होणार, असा दावा देखील नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात करीत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करा, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. यावर देखील आमदार शहाजीबापू पाटील यांनी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ येईल की ते म्हणतील आम्हाला एक पण जागा नको पण मला मुख्यमंत्रीपद द्या. पण ते काही मुख्यमंत्री होणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं देखील शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानाला आता ठाकरे गट नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.