नीट पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक खुलासा
शिवराज मोटेगावकरने केमिस्ट्रीच्या प्रश्नांसाठी ५ लाख रुपये दिल्याचं समोर
मुलगा शिकत असलेल्या क्लासला पुरवले प्रश्न
महिनाभरापूर्वी नीट पेपर फुटी प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणामुळे राज्यासह देशाचं देखील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं . परिणामी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. तब्बल १८ दिवस उपोषण केल्याने त्यांची तब्बेत खालावली आहे. अशातच आता याप्रकरणात पेपरफुटीचा मास्टरमाईंड असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी आणि त्यांच्याशी संबंधित शिवराज मोटेगावकर संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मोटेगावकरने केमिस्ट्रीच्या प्रश्नांसाठी ५ लाख रुपये दिल्याची माहिती आहे. सीबीआयच्या तपासामध्ये ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
सीबीआयच्या तपासानुसार, मोटेगावकरचा मुलगा कुलकर्णी यांच्या ‘केमिस्ट्री ट्युटोरियल्स’ या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता. याच ठिकाणी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पुरवण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. लीक झालेल्या प्रश्नांच्या बदल्यात मोटेगावकरने ५ लाख रुपये दिल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान सीबीआयने मोटेगावकर यांचा मोबाईल जप्त केला. फॉरेन्सिक तपासात मोबाईलमध्ये ३६ फोटो आढळले, त्यापैकी ५ फोटो डुप्लिकेट होते. या फोटोंमध्ये हाताने लिहिलेले १३२ रसायनशास्त्राचे प्रश्न होते. या प्रश्नांची तपासणी केले असता ते NTAच्या मास्टर प्रश्नसंचामधील १११ प्रश्न तंतोतंत जुळल्याचे निष्पन्न झाले.
मोबाईलच्या मेटाडेटातून आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला. हे फोटो ३ मे रोजी काढण्यात आले होते, म्हणजे नीट परीक्षा होण्याच्या सुमारे दहा दिवस आधीच प्रश्न आरोपींकडे पोहोचले होते. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, हे प्रश्न स्वतः मोटेगावकरने लिहून घेतले होते. या मोठ्या पेपर लीक रॅकेटमध्ये सीबीआयने आतापर्यंत पुणे, लातूर आणि इतर भागांमधून १३ जणांना अटक केली असून तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.