
नाशिकच्या मांडसांगवी येथील शेतकऱ्यांची ५० एकरहून अधिकची शेत जमीन हडपल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलाय. महाजन यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय सुनील झंवर यांच्यावर जमीन लाटल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे भाजपचे संकटमोचक ५० वर्षपूर्वीच्या प्रकरणामुळे संकटात सापडण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या मांडसांगवी येथील शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडालीय. मांडसांगवी गावातील वडिलोपार्जित शेती हडपल्याच्या प्रकरणात गावातील पंचही यामध्ये सहभागी असल्याचा दावा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलाय.दरम्यान हे प्रकरण ५० वर्षांपूर्वीचं प्रकरण असून महाजन यांनी शेतकऱ्यांची ५० एकरहून अधिकची जमीन हडपलीय, असा आरोप केला जातोय.
दरम्यान या संपूर्ण आरोपावर मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय सुनील झंवर यांनी आरोप फेटाळून लावलेत. माझ्याकडे सर्व कागदपत्रे असून केलेले आरोप निरर्थक आहेत. नाशिक न्यायालयाच्या आदेशानेच ही जमीन घेतली आहे. आपला न्यायालयावर विश्वास असल्याचं खुलासा झंवर यांनी आरोप फेटाळून लावताना केलाय.
नाशिकजवळील माडसांगवी येथील ३६ शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची ५० एकर जमीन मंत्री गिरीश महाजन यांनी बेनामी व्यवहार करून हडपली, असा आरोप शेतकरी आणि त्यांच्या वकिलांनी एका पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी संबंधित सुनील झंवर आणि भारत स्टील ट्युब्स लि. कंपनी यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच हा व्यवहार रद्द करून शेतकऱ्यांना जमिनी परत कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलीय.
माडसांगवी येथील ३६ शेतकऱ्यांनी सुमारे ५० एकर जमीन स्वतःची गुरे चारण्यासाठी पडीक ठेवलेली होती. या गावातील काही व्यक्तींनी बनावट कागदपत्र तयार करून ही जमीन १९८२ साली भारत स्टील ट्युब्स लिमिटेड नवी दिल्ली यांना विकली. त्याला काही शेतकऱ्यांनी विरोध करत प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तेथे त्यांना न्याय मिळाला नाही.
बनावट कागदपत्रांद्वारे व्यवहार केलाय. शेतकऱ्यांची शेतजमीन ही खासगी मालमत्ता असल्याने तिचा कंपनीशी व्यवहार होऊ शकत नाही, असा आक्षेप घेतला. यामुळे या क्षेत्रावर महाराष्ट्र शासनाचे नाव लावण्यात आले.
त्यानंतर भारत स्टील ट्युब्स लि. कंपनीच्या संचालकाने गिरीश महाजन यांच्याशी जवळीक असलेले जळगाव येथील सुनील देवकीनंदन झंवर यांच्याशी संपर्क साधला. पुन्हा काही बनवाट कागदपत्रे बनवून स्टील कंपनीचे नाव सातबारा उताऱ्यावर लावले. या कंपनीकडून सुनील झंवर यांनी २०१५ मध्ये शासकीय मूल्यानुसार हे क्षेत्र ३ कोटी ३ लाख ३ हजार तीस रुपयांना विकत घेतली. कागदोपत्रावर सुनील झंवर दिसत असले तरी गिरीश महाजन यांनीच झंवर यांच्या नावे बेनामी व्यवहार केला.
महाजन हेच खरे या व्यवहाराचे सूत्रधार आहेत, असा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय. यासंदर्भात तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी शेखर देसाई यांच्याकडे महसुली नियमानुसार तक्रार केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र शासकीय यंत्रणेचा गैरउपयोग करून ही जमीन परस्पर एका कंपनीला विक्री गेली, असे पेखळे कुटुंबीयांनी सांगितले. आता ही जमीन जळगावच्या अन्य एका बिल्डरला विकण्यात आलीय. संबंधित विकास या जमिनीचे प्लॉट करून विक्री करण्याची तयारी करीत आहे. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.