लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ५) रात्री मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला.
विजय करंजकर हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र, ठाकरेंनी ऐनवेळी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे करंजकर हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात होतं.
अखेर रविवारी विजय करंजकर यांनी थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच विजय करंजकर यांच्यावर उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विजय करंजकर यांची नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अचानक शिंदे गटात प्रवेश केल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. करंजकर यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांची ताकद वाढली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. नाशिकची जागा शिंदे गटाला दिल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते नाराज आहेत. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.