अजय सोनवणे, नाशिक प्रतिनिधी
Nashik Surgana earthquake latest news : शुक्रवारी रात्री सुरगाणा तालुक्यात ऐन गणेशोत्सवाच्या उत्साहात नागरिक आरतीसाठी एकत्र जमले असतानाच अचानक जोरजोरात जमीन हादरली. एकापाठोपाठ एक भूकंपाचे दोन धक्के बसल्याने संपूर्ण गाव प्रचंड भयभीत झाले आणि लोकांनी घराबाहेर आणि मोकळ्या मैदानाकडे धाव घेतली. वारंवार बसणाऱ्या या धक्क्यांमुळे संपूर्ण सुरगाणा परिसरात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र थांबताना दिसत नाहीये. शुक्रवारी रात्री सुरगाण्यातील घाटमाथ्यावरील परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री ७.१९ वाजता घाटमाथ्यावरील डांगराळे, शिंदे दिगर, रोकडपाडा, कुंभीपाडा आणि भरडमाळ या भागात पहिला धक्का बसला, ज्याची तीव्रतेचा अंदाज ३.४ रिस्टर स्केल वर्तवला जात आहे. यानंतर रात्री १०.४० मिनिटांच्या सुमारास दुसऱ्यांदा कमी तीव्रतेचा धक्का जाणवला.
आरती सुरू असतानाच जोरदार आवाज अन् जमीन हादरली
शिंदे दिगर येथील पोलीस पाटील काशिनाथ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात गणपतीची आरती सुरू असताना सर्व नागरिक मोकळ्या मैदानात एकत्र आले होते. नेमक्या त्याच वेळी जमिनीतून जोरदार धक्का जाणवला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे लोक घाबरले आणि धावपळ उडाली.
१५ ते १६ वेळा बसले धक्के, जमिनीला पडल्या भेगा
रोकडपाडा येथील सरपंच गोविंद भोये यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, या भागात भूकंपाच्या धक्क्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असून आतापर्यंत १५ ते १६ वेळा असे धक्के बसले आहेत. भरडमाळ भागात यापूर्वीच जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत, ज्याची पाहणी स्थानिक तलाठ्यांनी केली आहे.
दिंडोरीतील शिंदपाडा ठरतंय केंद्रबिंदू
दिंडोरी तालुक्यातील भनवड ते गोगुळ दरम्यान असलेल्या शिंदपाडा येथे या भूकंपाचे केंद्र (Epicenter) असल्याचे स्पष्ट होत आहे, त्यामुळे या परिसरात वारंवार धक्के जाणवत आहेत.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर रोकडपाडा येथील सीताराम खांडवी, रोहिदास वाघमारे, कांतीलाल खांडवी आणि प्रकाश गवळी यांनी तात्काळ घराबाहेर पडून नागरिकांना सावध राहण्याचे व सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना भयभीत न होता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.