नाशिकच्या कळवण तालुक्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के
आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरुळ आणि अंबापूर परिसरात हादरे जाणवले
भूकंपाचे धक्के साधारण ३ ते ५ सेकंद जाणवले
कोणतीही जीवितहानी नाही
नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकला पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. तब्बल ८ दिवसांनंतर दुसऱ्यांदा नाशिक भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. जिल्ह्यातील कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात हे धक्के जाणवले. रात्री १२ वाजून ०६ मिनिटांनी आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरुळ आणि अंबापूर परिसरातील नागरिकांना काही सेकंद भूकंपाचे हादरे जाणवले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास १२ वाजून ०६ मिनिटांनी नाशिक जिल्ह्यातील आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरुळ आणि अंबापूर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हे धक्के साधारण तीन ते पाच सेकंद जाणवले. या दरम्यान घरातील वस्तू तसेच काही ठिकाणी दरवाजे-खिडक्या हलल्याचे नागरिकांनी सांगितले. धक्का जाणवताच काही नागरिक घाबरून घराबाहेर पडले. विशेष म्हणजे, भूकंपाच्या धक्क्यांच्या दरम्यान काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी घबराट निर्माण झाली. या भूकंपाचे केंद्रबिंदू निर्घुडपाडा असल्याची माहिती आहे.
दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी याच परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यानंतर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून नागरिकांना पुन्हा भूकंपाच्या धक्क्याला सामोरे जावे लागू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार रात्री झालेल्या भूकंपाने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करणे गरजेचे आहे.
सुदैवाने, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी केली जात असून, भूकंपाची तीव्रता आणि केंद्र याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. वारंवार जाणवणाऱ्या या धक्क्यांमुळे कळवण तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.