अशोक खरातवर १० गुन्हे दाखल
हवाला रॅकेट आणि दुबई कनेक्शन उघड
१५० हून अधिक महिलांच्या शोषणाचा आरोप
आर्थिक फसवणूक आणि धमकीचे प्रकार
SIT कडून सखोल तपास सुरू
अभिजित सोनावणे, नाशिक
महाराष्ट्रातील नाशिकचा स्वयंघोषित 'बाबा' आणि बलात्काराचा आरोपी अशोक खरात याच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्याच्या विरोधात आतापर्यंत एकूण आठ एफआयआर दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री उशिरा त्याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. म्हणजेच आता खरात प्रकरणात १० गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील ८ हे लैंगिक अत्याचार संदर्भातील असून २ फसवणुकीचे आहेत. धक्कादायक म्हणजे भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे, आणि यासाठी बड्या अधिकाऱ्यांनी त्याला मदत केल्याचे देखील उघड झाले आहे. या प्रकरणी SIT चा सखोल तपास सुरु आहे.
महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने केलेल्या तपासात भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवाल्याचा वापर करत होता. या पैशांची देवाण-घेवाण दुबई पर्यंत होत असून या मध्ये खरातचे अनेक बडे भक्त व अधिकारी त्याला मदत करायचे. त्यामुळे हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता असून याबाबत SIT ला सबळ पुरावे मिळाल्याची माहिती आहे.
अशोक खरातने अंकशास्त्राच्या आधारावर भविष्य सांगण्याच्या बहाण्याने १५० हुन अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणाची पोल खोल झाली असून आता खरातचे अनेक काळे धंदे बाहेर येत आहेत. आता पर्यंत त्याच्यावर ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये ७ लैंगिक अत्याचार आणि १ फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता खरातच पाय आणखी खोलात अडकत जात आहे.
काल रात्री उशिरा २ गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यात एका महिलेचं तिच्या नवऱ्याशी सतत भांडण व्हायचं त्यावर सल्ला घेण्यासाठी गेली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. महिलेने दिलेल्या जबाबानुसार, खरातने म्हटले मी महादेवाचा अवतार असून माझ्यासोबत शरीर संबंध ठेवल्यास तुझ्या वरील संकट दूर होणार आणि नकार दिल्यास तुझ्या कुटुंबातील मुलांचा आणि नवऱ्याचा मृत्यू होईल. अशी धमकी देत महिलेचे लैंगिक शोषण केले. दुसऱ्या गुन्ह्यात व्यवसायिकाची लाखोंना फसवणूक केल्याचे समोर आले आहे. नेवासा येथील व्यावसायिकाला व्यवसायिक बरकतीसाठी वेगवेगळ्या अंगठ्या लाखो रुपयांना विकून फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप चौकशी सुरु असून खरातचा पाय आणखी खोलात अडकण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.