नाशिकच्या इंदिरानगर परिसरात एक २० वर्षीय तरूणीची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना रात्री १०.३० च्या सुमारास वनसंपदा सोसायटीतील गार्डनमध्ये घडली. मृत तरूणीचे नाव वैष्णवी अनिल आवारे असून तरूणी पीजीमध्ये राहत होती. प्राथमिक अंदाजानुसार एकतर्फी प्रेमप्रकरणातून हत्या घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. परंतु आता या हत्येप्रकरणात नवीन ट्विस्ट आल्यानं खळबळ उडालीय. ज्या आरोपीने वैष्णवीचा जीव घेतला त्याचाही मृतदेह एका झाडाजवळ आढळलाय. या प्रकरणामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी आणि साहिल अशोक लाव्हारे यांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु वैष्णवी दुसऱ्या मुलाशी लग्न करणार होती. ही गोष्ट साहील आवारे याला आवडली नाही, वैष्णवी दुसऱ्यासोबत लग्न करणार असल्याने तो संतापला होता. या संतापाच्या भरात त्याने वैष्णवीवर चाकू हल्ला करत तिची हत्या केली. वैष्णवी इंदिरानगर परिसरातील गार्डनमध्ये होती. ती फोनवर आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलत होती त्याचवेळी साहिलनं तिच्यावर हल्ला केला.
हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी साहिल अशोक लाव्हारे तेथून पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. परंतु आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. शनिवारी ( १८ जुलै ) पहाटेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर परिसरातील जॉगिंग ट्रॅकजवळी एका झाडाजवळ साहिल मृतअवस्थेत आढळला. साहिल अशोक लाव्हारे याने झाडाला गळफास घेतला होता. साहिलाचा मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणाला वेगळं वळण आलंय.
इंदिरानगरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय. या घटनेमागील नेमके कारण आणि घटनाक्रमाचा तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.