

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर एसीबीचा छापा
क्लर्क राजेंद्र ढेरंगे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं
या प्रकरणी नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया दिली
'चौकशीत माझे नाव आले तर राजीनामा देईन', असे स्पष्टपणे सांगितले
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर गुरूवारी संध्याकाळी एसीबीने छापा टाकला. या छाप्यादरम्यान झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या क्लर्लला पोलिसांनी लाच घेताना रंगेहाथ पडले. याप्रकरणी पोलिसांनी क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे मंत्रालयात खळबळ उडाली आहे. थेट मंत्रालयात झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे. झिरवाळ यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. आता या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'चौकशीमध्ये जर माझे नाव आलं तर मी राजीनामा देईन.', असं नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या नरहरी झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलताना एसीबीच्या छाप्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, 'मी दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. काल जो काही प्रकार घडला तो अतिशय चुकीचा होता. असे व्हायला नको होते. राजेंद्र ढेरंगे हे क्लर्क म्हणून काम करतात. सुनावणीचे कागदपत्र तयार करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. ते मुळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी आहेत. या प्रकाराला मी कुठेही पाठीशी घालणार नाही.'
झिरवाळ यांनी असेही सांगितले की, 'मंत्री, पीए यांच्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे पूर्वीचे काही गुण होते त्याबद्दल सांगता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी काही मंत्रालयाचा स्टाफ खूप बारकाईने तपासूनच दिला आहे. त्याची कधीही तक्रार आली नव्हती पण त्याने काल काय प्रकार केला त्याबाबत सांगता येणार नाही. लाचेची रक्कम कितीही असली तरी सरकारी कर्मचाऱ्याने अशाप्रकारे पैसे घेणे चुकीचे आहे. पैसे घेतले आहेत तर त्याची शिक्षा आता त्याला भोगावी लागेल.'
तसंच, 'राजेंद्र ढेरंगेंनी जी हिंमत केली त्यासाठी त्याला आता जबाब द्यावा लागेल. तो सरकारी कर्मचारी आहे आणि त्याच्यासाठी ५० हजार रुपये फार आहे असं नाही. पण त्याने अशा गोष्टी करायला नकोत. जर खरंच त्याच्याशी माझा संबंध सापडला तर मी राजीनामा देईन. त्याच्या चौकशीतून काही माझ्यापर्यंत आलं तर मी राजीनामा देईल.', असे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.