धडगावमध्ये कौटुंबिक वादातून आग लावण्याची घटना
जावयाने सासरवाडी आणि शेजाऱ्याचे घर जाळले
दोन कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान
आरोपी फरार, पोलिस तपास सुरू
परिसरात संतापाची लाट
संसाराचा गाडा ओढण्यासाठी पती पत्नी महत्त्वाचे मानले जातात. कधीतरी दोघांमध्ये खटके उडणं साहजिक आहे. मात्र त्यातही रुसलेल्या पतीची किंवा पत्नीची माफी मागून नातं पूर्वीसारखं सुरळीत करणं ही देखील दोघांची जबाबदारी मानली जाते. मात्र एका गावात धडगाव तालुक्यात रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला सासरकडची मंडळी परत पाठवत नसल्याच्या रागातून, एका जावयाने चक्क सासरवाडीच पेटवून दिली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ सासरवाडीच नाही, तर शेजाऱ्याचे घरही या आगीत जळून खाक झाले आहे. ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडक्याचा पाटील पाडा येथील मिथुन पाडवी याचे लग्न कुंडल येथील मुलीशी झाले होते. मात्र वादामुळे मिथुन यांची पत्नी माहेरी राहत होती. काही दिवसांनी राग शांत झाल्यावर मिथुन पत्नीला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले होते. मात्र मिथुन यांना त्यांच्या सासऱ्यांनी मुलीला परत पाठवण्यास नकार दिला. सासऱ्यांचा नकार ऐकून मिथुन यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
संतापलेल्या मिथुन यांनी पत्नीला माघारी पाठवत नसल्याने थेट सासुरवाडी गाठून घराला आग लावून दिली. उन्हाळ्याचा तडाखा आणि वाऱ्यामुळे ही आग शेजारी राहणाऱ्या सुभाष वळवी यांच्या घरापर्यंतही पसरली. या भीषण आगीत दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात अन्नधान्य, कपडे आणि घराचे छप्पर जळून खाक झाले असून दोन्ही कुटुंबे आता उघड्यावर आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.