Nagpur MLC Election Congress Candidate : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र, नागपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. भाजपने आपला उमेदवार आधीच घोषित करून आज त्यांचा नामांकनाचा अर्जही दाखल केला आहे. पण दुसरीकडे, काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत वाद आणि गटबाजीमुळे अजूनही उमेदवाराच्या नावावर एकमत होऊ शकलेले नाही.
सुनील केदार आणि नितीन राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर
नागपुरात काँग्रेसचा उमेदवार निश्चित न होण्यामागे पक्षातील दोन बडे नेते सुनील केदार आणि नितीन राऊत यांच्यातील अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारीवरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हा वाद इतका टोकाला गेला आहे की, नागपुरात सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतून सुनील केदार बाहेर पडल्यानंतरच नितीन राऊत यांनी बैठकीला हजेरी लावली. नेत्यांमधील या थेट वादामुळे उमेदवाराचे नाव अंतिम करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांच्या नावांची चर्चा
सध्या काँग्रेसकडून मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. मात्र, दुसरीकडे सुनील केदार गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नावासाठी आग्रह धरला जात असल्याची माहिती आहे. दोन्ही गटांकडून आपापल्या उमेदवारासाठी फिल्डिंग लावली जात असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
काँग्रेसचा 'प्लॅन बी' काय?
ऐनवेळी कोणतीही तांत्रिक अडचण किंवा अंतर्गत वाद उद्भवू नये म्हणून काँग्रेसकडून खबरदारीचा उपाय म्हणून ४ उमेदवारी अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. कोणाला उमेदवारी द्यावी हा तिढा सुटत नसल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत साधण्यासाठी काँग्रेसची युक्ती लढवण्यात आली. चार पैकी तीन जण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आपला अर्ज मागे घेतील असा फॉर्मुला ठरला आहे. चार पैकी दोन उमेदवारांच्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडले जाईल, असे समजतेय. तर एका नावासमोर प्रिन्सिपल उमेदवार तर दुसऱ्याच्या नावासमोर सब्स्टिट्यूट उमेदवार असा उल्लेख राहील असे समजतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.